अमेरिकेवर हल्ल्याची क्षमता असलेल्या अण्वस्त्रांची संख्या वाढविण्यासाठी चीनच्या जोरदार हालचाली

- अमेरिकी दैनिकाचा दावा

अण्वस्त्रांची संख्याबीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता असणार्‍या अण्वस्त्रांच्या संख्येत भर टाकण्यासाठी चीनने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर चीनमधील गान्सु प्रांतात चीनने अण्वस्त्रांसाठी १००हून अधिक ‘सिलोस’ची उभारणी केली आहे. या बांधकामाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने विश्‍लेषक तसेच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’(सिप्री) या अभ्यासगटाने अण्वस्त्रांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात चीनकडे ३५० अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात आले होते. चीन आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात वेगाने वाढ करीत असून आधुनिकीकरणाची प्रक्रियाही सुरू असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात नमूद केले होते. अमेरिकी दैनिकाने दिलेले वृत्त याला दुजोरा देणारे आहे.

अण्वस्त्रांची संख्यामारा करण्यासाठी सज्ज असणार्‍या अण्वस्त्रांसाठी उभारण्यात आलेल्या भूमिगत चेंबर्सना ‘सिलो’ म्हटले जाते. गेल्या काही महिन्यात अण्वस्त्रांची संख्या वाढवित असल्याची कबुली चीनच्या सत्ताधारी राजवटीने दिली होती. मात्र ही अण्वस्त्रे राष्ट्रीय सुरक्षा व हितसंबंध जपण्यासाठी असल्याचे समर्थन करण्यात आले होते. मात्र अमेरिकी गुप्तचर यंत्रणा व विश्‍लेषकांनी चीन अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी अण्वस्त्रांच्या संख्येत भर टाकत असल्याचा दावा केला.

चीनकडून नव्याने उभारण्यात येणारे सिलोस हे ‘डीएफ-४१’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासाठी असल्याचे समोर येत आहे. ‘थर्मोन्यूक्लिअर वेपन’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘डीएफ-४१’चा वेग ध्वनीच्या २५ पट अर्थात ‘मॅक-२५’ इतका आहे. ‘डीएफ-४१’चा टप्पा १२ ते १५ हजार किलोमीटर्सचा असल्याचे सांगण्यात येते. चीनने २०१९ साली हे क्षेपणास्त्र आपल्या संरक्षणदलात सामील करून घेतले आहे. त्यानंतर याच्या निर्मितीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला असून सध्या चीनच्या ताफ्यात १००हून अधिक ‘डीएफ-४१’ असल्याचा दावा करण्यात येतो.

अण्वस्त्रांची संख्यामात्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या माहितीत चीन ‘डीएफ-४१’साठी मोठ्या प्रमाणात सिलोस उभारत आहेत. याचा अर्थ चीनकडे दावा करण्यात येणार्‍या आकडेवारीपेक्षा जास्त अण्वस्त्रे उपलब्ध आहेत, असे विश्‍लेषकांनी म्हटले आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग, गुप्तचर यंत्रणा तसेच अभ्यासगटांनी २०३० सालापर्यंत चीनकडील अण्वस्त्रांची संख्या हजारापर्यंत जाऊ शकते, असे बजावले आहे. ही वाढ अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच असू शकते, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

अमेरिकेकडून तैवानला देण्यात येणारे संरक्षणसहाय्य व साऊथ चायना सीमधील वाढत्या हालचाली यामुळे चीन अस्वस्थ आहे. अशा स्थितीत अमेरिकेविरोधात संघर्षाची वेळ ओढविल्यास पुरेपूर सज्जता हवी, या हेतूने चीन अण्वस्त्रक्षमता वाढविण्यावर भर देत आहे, असे अमेरिकी दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

leave a reply