वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेनचे युद्ध पेटलेले असतानाच, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने पूर्व युरोपमध्ये साडेदहा हजार जवान तैनात करण्याची घोषणा केली. ही तैनाती युक्रेनसाठी नाही, पण नाटोच्या सदस्यदेशांचे रक्षण करण्यासाठी ही तैनाती करण्यात येत आहे, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. या तैनातीबाबतच्या बातम्या येत असतानचा, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे.
युक्रेनचे युद्ध पेटण्याआधी युरोपिय देशांमध्ये अमेरिकेचे जवळपास 80 हजार जवान तैनात होते. पण युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने नाटोच्या सदस्यदेशांसह रशियानजिकच्या देशांमध्ये आपली तैनाती वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. विशेषतः रशियावर लष्करी दडपण वाढविण्यासाठी अमेरिका व नाटोने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर, रशियाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वाढल्याने, अमेरिका ही तैनाती वाढवित असल्याचे दिसते. त्याचवेळी आपल्या नव्या तैनातीमुळे वाढलेल्या तणावाचे रुपांतर घनघोर संघर्षात होऊ नये, याचीही अमेरिका दक्षता घेत आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये अशारितीने चर्चा झालेली नव्हती, असा दावा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर, ही चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरते. युक्रेनचे युद्ध सुरू असताना, अमेरिका व रशियामधील संपर्क कायम ठेवण्यावर या चर्चेत एकमत झाल्याचे सांगितले जाते. मात्र याचे अधिक तपशील समोर आलेले नाहीत. दोन्ही देशांनी आपल्या संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेबाबतची अधिक माहिती देण्याचे टाळले आहे.
युक्रेनचे युद्ध निर्णायक वळणावर असल्याचे सामरिक विश्लेषक सांगत आहेत. हे युद्ध जितके लांबेल, तितक्याच प्रमाणात रशियाचे सामर्थ्य कमी होईल, असा अमेरिकेचा तर्क आहे. यासाठीच अमेरिका व पाश्चिमात्य देश युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य करून रशियाला जेरीस आणण्याचे डावपेच आखत आहेत. पण रशियाने ही बाब आधीच लक्षात घेतली होती व हा देश दीर्घकालिन युद्धासाठीही तितकाच सज्ज असल्याचा दावा सामरिक विश्लेषक करीत आहेत. इतकेच नाही तर वेळ पडल्यास राष्ट्राध्यक्ष पुतिन पाश्चिमात्यांनी विचारही केला नसेल, असे डावपेच वापरतील, असा इशारा काही सामरिक विश्लेषकांनी अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांना दिला आहे. तर नाटोने रशियन सीमेपर्यंत विस्तार केल्यास रशिया न्यूक्लिअर फोर्सेसचा वापर करताना कचरणार नाही, असा इशारा रशियाचे उपपराष्ट्रमंत्री अलेक्झँडर ग्रुश्कोव्ह यांनी दिला आहे. याआधीही रशियाच्या नेत्यांनी युक्रेनच्या संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होईल, असे नाटोला बजावले होते. त्याचवेळी नाटो देशांच्या सध्याच्या राजकीय नेतृत्त्वाकडे अणुयुद्धाचे गांभीर्य ओळखण्याइतकी प्रगल्भता नसल्याची टीका रशियाने केली होती. मात्र रशियाच्या या इशाऱ्याकडे युरोपिय देश संवेदनशीलतेने पाहत असल्याचे दिसत आहे.