रशियावरील निर्बंधांवरून अमेरिका भारताशी यापुढेही चर्चा करील

- व्हाईट हाऊसचा दावा

जीनिव्हा/संयुक्त राष्ट्रसंघ/वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगात युक्रेनच्या युद्धासंदर्भात मांडण्यात आलेल्या रशियाविरोधी ठरावावर मतदान करण्याचे भारताने टाळले. गुरुवारी या ठरावावरील मतदानाच्या वेळी भारताने अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. तर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांसंदर्भात अमेरिका इतर देशांसह भारताशीही चर्चा करील, असे म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, अमेरिकेने भारताला केलेल्या सहाय्याचीही यावेळी जेन साकी यांनी सूचक शब्दात आठवण करून दिली.

रशियाने चढविलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये भयंकर मानवी आपत्ती ओढावली असून इथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा मानवाधिकार आयोगात मांडण्यात आलेल्या ठरावात करण्यात आला. युक्रेनचे युद्ध त्वरित रोखण्याची मागणी या ठरावात करण्यात आली आहे. या ठरावाचे स्वरूप रशियाविरोधी असल्याने, भारताने सदर ठरावावरील मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णयघेतला. सदर ठरावाच्या बाजूने 33 देशांनी मतदान केले. तर चीन, इरिट्रिया या देशांनी त्याला विरोध केला. भारतासह पाकिस्तान, क्युबा, कझाकस्तान, उझबेकिस्तान, व्हेनेझुएला, नाम्बिया, सेनेगल, सुदान, आर्मेनिया, बोलिव्हिया, कॅमेरून हे देश मतदानाच्या वेळी अनुपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजनैतिक अधिकारी इंद्र मणी पांडे यांनी यासंदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट केली. राजनैतिक वाटाघाटी हा युक्रेनचे युद्ध रोखण्याचा एकमेव मार्ग आहे, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली होती. सुरूवातीपासूनच भारत यावर ठाम आहे आणि अनुसरूनच भारत निर्णय घेत असल्याचे पांडे यांनी लक्षात आणून दिले. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, अमेरिका रशियावरील निर्बंधांच्या संदर्भात भारताशी चर्चा करीत असल्याची माहिती दिली. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग यांनी यासाठी नुकतीच भारताला भेट दिली होती, असे सांगून त्यांनी भारताला दिलेल्या धमकीची साकी यांनी नव्याने आठवण करून दिल्याचे दिसत आहे.

याबरोबरच कोरोनाची तीव्र लाट आलेली असताना, अमेरिकेने भारताला सहाय्य केले होते, याचीही आठवण यावेळी जेन साकी यांनी करून दिली.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन दक्षिण कोरिया आणि जपान या देशांच्या दौऱ्यावर चालले आहेत. क्वाडचे सदस्य असलेल्या भारत व ऑस्ट्रेलियाला देखील राष्ट्रध्यक्ष बायडेन भेट देतील, अशी माहिती साकी यांनी दिली आहे. पण याचे तपशील आपण आता देऊ शकत नाही, असे साकी पुढे म्हणाल्या.

बायडेन यांच्या दक्षिण कोरिया दौऱ्याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. दक्षिण कोरियात नवे सरकार सत्तेवर आले आहे. नवे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी उत्तर कोरिया व चीन या देशांच्या विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण कोरियाला क्वाडमध्ये सहभागी करून घेण्याचा विचार अमेरिका करीत असल्याची चर्चा आहे. क्वाडच्या इतर सदस्यदेशांप्रमाणे भारताने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला विरोध करण्याचे टाळले होते. त्यानंतर अमेरिकेने भारताचा क्वाडमधील पर्याय म्हणून दक्षिण कोरियाचा विचार करण्यास सुरूवात केल्याचे संकेत मिळत होते. दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी तशा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

leave a reply