पॅरिस/अथेन्स – ‘इराण पद्धतशीरपणे रेड सीमध्ये स्वत:चे तळ प्रस्थापित करीत आहे. या सागरी क्षेत्रातील इराणच्या विनाशिकांची गस्त आंतरराष्ट्रीय वाहतूक, इंधन पुरवठा आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी थेट धोका ठरते. भूमध्य समुद्र आणि त्यापलिकडील सागरी क्षेत्रातील शांती व स्थैर्यासाठी देखील इराणची ही तैनाती धोकादायक ठरते’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच या सागरी क्षेत्रातील इराणच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे गांत्झ यांनी लक्षात आणून दिले.
दोन दिवसांपूर्वी फ्रान्स आणि ग्रीसच्या दौऱ्यावर गेलेल्या इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराण व लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाहच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. ग्रीसमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक ‘इकोनॉमिक गव्हर्मेंट राऊंडटेबल’ या बैठकीत इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणच्या विनाशिकांच्या रेड सीमधील गस्तीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले.
तर गेल्या आठवड्यात इराणने प्रक्षेपित केलेल्या सॅटेलाईटबाबतही पाश्चिमात्य देशांना सावध केले. सेमान प्रांतातून सॅटेलाईट प्रक्षेपित करून इराणने स्वत:कडे युरोपपर्यंत पोहोचू शकणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान असल्याचे दाखवून दिले आहे, याची आठवण गांत्झ यांनी करून दिली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांबरोबरच इराणचे ड्रोन्स देखील युरोपपर्यंत पोहोचत आहेत.
तसेच गेल्या काही वर्षांमध्ये इराणने आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या मालवाहतूक जहाजांना लक्ष्य करणे आणि अपहरण करणे सुरू ठेवल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला. अशा परिस्थितीत, इराणच्या विनाशिकांची रेड सीमधील वाढती तैनाती अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लक्षात आणून दिले.
त्याचबरोबर भूमध्य समुद्रातील इस्रायलच्या इंधनप्रकल्पावर ड्रोन हल्ले चढविणाऱ्या हिजबुल्लाहलाही गांत्झ यांनी बजावले. लेबेनॉनने हिजबुल्लाहचा बंदोबस्त केला नाही तर इस्रायल स्वत: तो करील, असा इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला.