अमेरिकन सिनेटरच्या भेटीचा निषेध करण्यासाठी तैवानजवळ चीनच्या लष्कराचा युद्धसराव

बीजिंग – अमेरिकेच्या सिनेटमध्ये तैवानच्या समर्थनार्थ प्रस्ताव सादर करणारे सिनेटर रिक स्कॉट तैवानच्या भेटीवर आहेत. यावर आपला आक्षेप नोंदविण्यासाठी चीनने तैवानच्या दिशेने लढाऊ विमाने आणि विनाशिका रवाना करुन मोठा युद्धसराव सुरू केला. अमेरिका व तैवानमधील हातमिळवणी आणि चिथावणीला उत्तर म्हणून हा युद्धसराव आयोजित केल्याचे चीनने जाहीर केले. तसेच चीन तैवानबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे चीनच्या संरक्षणदलप्रमुखांनी बजावले आहे.

एरवी आपल्या सागरी किंवा हवाईहद्दीजळवून चीनच्या विनाशिका किंवा लढाऊ विमानांनी धोकादायक उड्डाणे केल्याचा आरोप तैवानकडून केला जातो. गेल्याच महिन्यात चीनच्या 29 लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. पण शुक्रवारी आपल्या लष्कराने तैवानच्या हद्दीजवळ युद्धसरावाचे आयोजन केल्याची माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केली.

us-rick-scott-taiwanया युद्धसरावाच्या सहाय्याने युद्धसज्जता, गस्त आणि संघर्षाच्या कवायती पार पाडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु कियान यांनी स्पष्ट केले. तसेच हा युद्धसराव म्हणजे अमेरिका व तैवानमधील चीनविरोधातील हातमिळवणी आणि चिथावणीला उत्तर असल्याचे कियान म्हणाले. तर या सरावात चीनच्या काही लढाऊ विमानांनी तैवानच्या आखातातील मध्यरेखा पार करून तैवानच्या हवाईहद्दीपर्यंत प्रवास केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीतआहेत.

या युद्धसरावासाठी चीनने अमेरिकन सिनेटर तसेच आर्म्ड्‌‍ सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य रिक स्कॉट यांची भेट जबाबदार असल्याचे सांगितले. “अमेरिकन सिनटरच्या तैवानची भेट ‘वन चायना’ धोरणांचे आणि चीन-अमेरिकेमध्ये पार पडलेल्या चर्चेचे गंभीर उल्लंघन ठरते. यामुळे चीन व अमेरिकेमधील संबंध खराब होतील. तसेच तैवानच्या आखातातील तणावात भर पडेल”, असा इशारा प्रवक्ते वु कियान यांनी दिला. तर तैवानमधील लोकशाहीवादी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेला चीनच्या लष्कराने नवा इशारा दिला. ‘चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी युद्धासाठी नेहमीच सज्ज असते. चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या आणि तैवानच्या स्वातंत्र्यासाठी सहाय्य करणाऱ्यांना चीन यशस्वी होऊ देणार नाही’, अशी धमकी चीनच्या लष्कराचे प्रवक्ते वु कियान यांनी दिली.

china-exerciseकाही तासांपूर्वी चीनचे संरक्षणदलप्रमुख जनरल ली झोचेंग आणि अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्यात व्हर्च्युअल बैठक पार पडली. अमेरिका व तैवानमधील वाढत्या लष्करी सहकार्यावर जनरल झोचेंग यांनी ताशेरे ओढले. अमेरिकेने तैवानबरोबरचे लष्करी सहाय्य त्वरीत बंद करावे, अशी मागणी चीनच्या संरक्षणदलप्रमुखांनी केली. तसेच ‘तैवानच्या आखातात स्थैर्य हवे असेल आणि चीनबरोबरचे संबंध अबाधित राखायचे असतील तर अमेरिकेने तैवानला लष्करी सहाय्य करणे रोखावे’, असा इशारा जनरल झोचेंग यांनी दिला. गेल्या महिन्यात अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्याबरोबरच्या बैठकीत चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांनी असाच इशारा दिला होता.

दरम्यान, चीनकडून तैवानवरील हल्ल्याची शक्यता वाढत चालल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ले चढवू शकतो, असे विश्लेषक बजावत आहेत.

leave a reply