25 वर्षात विकसित देश बनण्याच्या भारताच्या संकल्पावर जगभरात चर्चा

विकसित देशनवी दिल्ली – अमेरिका व रशियासह जगभरातील प्रमुख देशांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी या देशांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात देशासमोर पुढच्या 25 वर्षात समोर ठेवलेल्या संकल्पांची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमसृष्टीने घेतल्याचे दिसत आहे. पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित देश बनण्याचे ध्येय भारताने समोर ठेवले आहे, याची नोंद आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असलेला भारत अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार देश असल्याचे आपल्या संदेशात म्हटले होते. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विधायक भूमिका पार पाडणे हा भारताचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगून रशियाबरोबरील भारताच्या मैत्रिपूर्ण संबंधांचा दाखला दिला. फ्रान्स नेहमीच भारताच्या बाजूने उभा राहिल आणि भारताच्या नेतृत्त्वाने आमचा पाठिंबा कायम जमेस धरावा, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुढच्या 75 वर्षात भारताबरोबरील ब्रिटनचे सहकार्य अधिकाधिक भक्कम होत जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ्‌‍ यांनी भारताबरोबरील मैत्री व भक्कम भागीदारीचा जर्मनीला अभिमान वाटतो, असे सांगून भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. तर ऑस्ेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज्‌‍ यांनी ऑस्ेलियाची जनता नेहमीच भारताचे यश व केलेल्या कामगिरीचे कौतूक करीत आलेली आहे, असे म्हटले आहे. त्याचवेळी ऑस्ेलियात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनी आपल्या देशाला दिलेल्या योगदानाचाही उल्लेख यावेळी पंतप्रधान अल्बानीज्‌‍ यांनी केला.

इस्रायलचे भारतावर अतिशय प्रेम आहे आणि इस्रायलची जनता भारतीयांवर प्रेम करते. सच्चा मित्र म्हणून इस्रायल भारताच्या आनंदात सहभागी होत आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी म्हटले आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील भारताला हिंदीमधून शुभेच्छा दिल्या आहे. जगभरातील प्रमुख नेत्यांकडून भारतावर सदिच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संदेश देताना पुढच्या 25 वर्षांसाठी समोर ठेवलेल्या संकल्पाची चर्चा जगभरातील माध्यमांनी सुरू केली. पुढच्या अडीच दशकात भारताला विकसित देश बनणे शक्य आहे का? त्यासाठी भारताला किती विकासदराने प्रगती करावी लागेल, याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील वृत्तसंस्थांनी काही निष्कर्ष नोंदविले आहेत. 130 कोटी इतकी प्रचंड जनसंख्या असलेला भारत पुढच्या काळात मोठ्या वेगाने आर्थिक प्रगती करील, हे जरी खरे असले तरी भारताला 25 वर्षात विकसित देश बनता येणार नाही, असे दावे काही वृत्तसंस्थांनी ठोकून दिले आहेत.

मात्र भारताने आजवर जगाचे अंदाज चुकविले असून देशाची क्षमता कोरोनाचे लसीकरण तसेच डिजिटल पेमेंट सारख्या गोष्टीतून सिद्ध झालेली आहे, याची जाणीव पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून करून दिली होती. पुढच्या काळात भारताने इतरांच्या दाव्यांवर नाही तर आपल्याच क्षमतेवर विश्वास ठेवावा, असे पंतप्रधानांनी म्हटले होते.

leave a reply