अमेरिका, दक्षिण कोरियातील युद्धसरावाविरोधात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी केली

korea-kim-bidenसेऊल – येत्या काही दिवसात अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये मोठा युद्धसराव पार पडणार आहे. उत्तर कोरियाच्या धमक्यांना किंमत न देता अमेरिका व दक्षिण कोरियाने हा युद्धसराव आयोजित केल्याचा दावा केला जातो. पण यामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने बुधवारी दोन क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी केली. याद्वारे उत्तर कोरियाने अमेरिका व दक्षिण कोरियाला इशारा दिल्याचे दिसत आहे. येत्या २२ ऑगस्टपासून दक्षिण कोरियाच्या हद्दीत अमेरिकेबरोबरचा ‘उल्ची फ्रिडम शिल्ड’ हा सराव होणार आहे. अकरा दिवसांच्या या लाईव्ह फायर युद्धसरावात शत्रू देशात घुसून धोकादायक ठिकाणांचा ताबा घेणे व सुरक्षित बाहेर पडणे, याचा अभ्यास केला जाईल. त्याआधी अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करामध्ये चार दिवसांचा प्राथमिक संयुक्त सराव सुरू झाला आहे. मंगळवारपासून सुरू झालेला हा सराव म्हणजे अमेरिका व दक्षिण कोरियन लष्करातील समन्वयाची कवायत असल्याचा दावा केला जातो.

अमेरिका व दक्षिण कोरियातील हे युद्धसराव आपल्याविरोधातील कारवाईची पूर्वतयारी असल्याचा आरोप उत्तर कोरियाने सातत्याने केला आहे. हे युद्धसराव रोखले नाही तर येत्या काळात या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या परिणामांसाठी अमेरिका व दक्षिण कोरियाच जबाबदार असतील, असा इशारा उत्तर कोरियाने दिला होता. डोनाल्ड म्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, त्यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांच्याशी चर्चा करून अणुकार्यक्रम रोखण्यावर चर्चा केली होती. याच काळात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांच्या चाचण्या देखील बंद केल्या होत्या.

korea-cruise-missilesया काळात दोन्ही कोरियन देशांच्या वादग्रस्त सीमेवर राष्ट्राध्यक्ष म्प आणि हुकूमशहा किम यांची भेट झाली होती. तर दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मून जे-ईन यांनी देखील अमेरिकेबरोबरचे युद्धसराव बंद करून उत्तर कोरियाला वाटाघाटींसाठी आमंत्रित केले होते. अमेरिका व दक्षिण कोरियाच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचा दावा केला जात होता. पण उत्तर कोरियाच्या धोरणातील या बदलामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नाराज झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

मात्र, वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून उत्तर कोरियाविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. यामुळे खवळलेल्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा सपाटा लावला आहे. तर तीन महिन्यांपूर्वी दक्षिण कोरियातही राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांचे सरकार सत्तेवर आले आहे. राष्ट्राध्यक्ष येओल यांनी अमेरिकेबरोबरचे युद्धसराव पुन्हा आयोजित केले जातील, अशी घोषणा केली होती. येत्या काही दिवसात दोन्ही देशांच्या लष्करात होणारा सराव याची सुरुवात आहे.

यामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी ओंचोन किनारपट्टीवरुन दोन क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी केली. उत्तर कोरियाची ही दोन्ही क्षेपणास्त्रे ‘यलो सी’च्या क्षेत्रात कोसळली. दरम्यान, दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष येओल यांनी सरकार स्थापन करून बुधवारी १०० दिवस पूर्ण झाले. नेमक्या याच दिवशी उत्तर कोरियाने क्रूझ्‌‍ क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांना इशारा दिल्याचा दावा केला जातो.

leave a reply