सुधारणा न केल्यास संयुक्त राष्ट्रसंघ आपले महत्त्व गमावून बसेल

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

सिडनी – वेळीच आवश्यक त्या सुधारणा घडविल्या नाहीत, तर संयुक्त राष्ट्रसंघ आपले महत्त्व गमावून बसेल, असा इशारा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आपल्याला प्रतिनिधित्त्व देत नाही, अशी काही खंडांची भावना झालेली आहे. अशा परिस्थितीत योग्य त्या सुधारणा करण्यावाचून राष्ट्रसंघासमोर पर्याय नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील आपल्या व्याख्यानात बजावले. त्याचवेळी भारताच्या ऑस्ट्रेलियाबरोबरील संबंधांचे महत्त्व अधिकाधिक प्रमाणात वाढत चालले आहे, असेही परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले.

Jaishankarलोव्ही इन्स्टीट्यूट या प्रख्यात अभ्यासगटासमोरील आपल्या व्याख्यानात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कारभारावर नेमक्या शब्दात टीका केली. गेल्या कित्येक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा घडविण्यास तयार नाही. विशेषतः सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांचा विस्तार करण्याची तयारी राष्ट्रसंघाकडून दाखविली जात नाही. यामुळे जगातील पहिल्या क्रमांकाची जनसंख्या व पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत असलेला भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनू शकलेला नाही. या विसंगतीवर बोट ठेवून जयशंकर यांनी सुधारणा घडविण्यासाठी उत्सुक नसलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कारभाराला लक्ष्य केले.

वेळीच योग्य त्या सुधारणा घडविल्या नाहीत, तर संयुक्त राष्ट्रसंघ आपली प्रासंगिकता गमावून बसेल आणि राष्ट्रसंघाचे महत्त्व कमी होईल, असा इशारा जयशंकर यांनी दिला. सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व हा भारताचा अधिकार ठरतो. सुधारणा न केल्यास… पण भारताला हे स्थान दिले जात नाही, याचे कारण कुणीतरी राष्ट्रसंघाच्या सुधारणा रोखून धरलेल्या आहेत, असा ठपका परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला. अर्थात या सुधारणा घडविणे संयुक्त राष्ट्रसंघासाठी सोपे नाही, पण या सुधारणा घडविणे आता अत्यावश्यकच बनले आहे. अन्यथा संयुक्त राष्ट्रसंघाचे महत्त्व कमी कमी होत जाईल, असा इशारा जयशंकर यांनी दिला.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा आणि स्थैर्य यासाठी भारताच्या ऑस्ट्रेलियाबरोबरील सहकार्याचे फार मोठे महत्त्व असल्याचे यावेळी जयशंकर यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील हे सहकार्य इंडो-पॅसिफिक क्षेत्र खुले व मुक्त तसेच स्थीर आणि समृद्ध बनेल, याची हमी देत असल्याचा दावा जयशंकर यांनी केला. भारत व ऑस्ट्रेलिया हे दोघेही आता क्वाडचे सदस्य असलेले देश आहेत. ही बाब दोन्ही देशांचे स्थान उंचावल्याचा दाखला देत असल्याचे सांगून जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

leave a reply