नाटो देशांच्या प्रत्येक इंच भूमीचे संरक्षण करू

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

प्रत्येक इंच भूमीचेब्रुसेल्स – नाटो सदस्यदेशांच्या प्रत्येक इंच भूमीचे रक्षण केले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केली आहे. नाटो देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक सुरू होण्याआधी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी ही घोषणा करून रशियाला इशारा दिल्याचे दिसत आहे. आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी अणुहल्ला चढवितानाही कचरणार नाही, अशी धमकी रशियाने दिली होती. त्यावर अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे दावे केले जातात. मात्र युक्रेनच्या युद्धावरून नाटोच्या सदस्यदेशांमध्ये एकवाक्यता नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना वाटाघाटी सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

रशियन भूभागाच्या संरक्षणासाठी अणुहल्ला चढविण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही. तसेच आपण देत असलेली ही धमकी पोकळ असल्याचे मानू नका, असा सज्जड इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला होता. त्याचे पडसाद युरोपसह जगभरात उमटले. त्यानंतर अमेरिकेने रशियाला गोपनीय संदेश पाठविल्याचे दावे काही अमेरिकी वर्तमानपत्रांनी केले होते. रशियाने युक्रेनवर अणुहल्ला चढविलाच, तर त्याचे भयंकर परिणाम रशियाला सहन करावे लागतील, अशी धमकी अमेरिकेने दिली होती. युक्रेन अजूनही नाटोचा सदस्य बनलेला नसला, तरी युक्रेनवरील रशियाच्या अणुहल्ल्याचे भयंकर परिणाम नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांना सहन करावे लागतील. अमेरिका व नाटो ते खपवून घेणार नाही, असे अमेरिकेच्या सीआयएच्या माजी प्रमुखांनी बजावले होते.

या पार्श्वभूमीवर, पुढच्याच आठवड्यात नाटोचा युद्धसराव सुरू होत असून यात अणुहल्ला चढविण्याची क्षमता असलेली लढाऊ विमाने देखील सहभागी होत आहेत. हा आपला नियोजित सराव असून याची तयारी युक्रेनचे युद्ध सुरू होण्याच्या आधीच झाली होती, असा खुलासा नाटोने दिला आहे. मात्र रशिया या युद्धसरावाकडे अत्यंत बारकाईने पाहत आहे. युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, हा युद्धसराव इथल्या तणावात भर घालणारा ठरेल आणि याचे विपरित परिणाम होऊ शकतात, ही बाब नाटो लक्षात घ्यायला तयार नाही. सध्याच्या परिस्थितीत हा सराव रद्द केला, तर त्यातून रशियाला चुकीचे संदेश जातील. यामुळे नाटोच्या क्षमतेबाबत रशिया चुकीचे आडाखे बांधून हा देश नवे लष्करी धाडस करू शकेल. ते टाळण्यासाठी नाटोचा हा युद्धसराव आवश्यक असल्याचा दावा नाटोप्रमुख स्टोल्टनबर्ग यांनी केला होता.

नाटोच्या या सरावाच्या पार्श्वभूमीवर, नाटो देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक पार पडत आहे. त्याच्या आधी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी नाटो देशांच्या प्रत्येक इंच भूमीचे रक्षण केले जाईल, अशी ग्वाही दिली. मात्र युक्रेन अजूनही नाटोचा सदस्य बनलेला नसताना, अमेरिकन संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या या ग्वाहीला फारसा अर्थ उरत नाही. तर दुसऱ्या बाजूला युक्रेनला नाटोचा सदस्य करून घ्यायचे की नाही, यावर नाटोमध्ये गंभीर मतभेद आहेत. जर्मनीने स्पष्ट शब्दात युक्रेनच्या सदस्यत्त्वाला विरोध केला आहे. तर नाटोच्या या बैठकीआधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांनी वाटाघाटींसाठी तयार व्हावे, असे आवाहन केले आहे. ही बाब देखील नाटोतील अंतर्गत मतभेद अधोरेखित करीत आहे.

युक्रेनी शहरांवरील रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हे युद्ध आता वेगळ्याच टप्प्यांवर आल्याचे दिसत आहे. पहिल्यांदाच या युद्धात युक्रेनच्या जवळपास सर्वच शहरांमध्ये नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. ही भयावह स्थिती असून रशियन राष्ट्राध्यक्षांनी शांतीचर्चेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले.

leave a reply