भारत रशियाबरोबरील व्यापारी तूट कमी करण्याच्या तयारीत

व्यापारी तूटनवी दिल्ली – अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियाला उत्पादन क्षेत्रासमोर अडथळे उभे राहिले आहेत. अशा परिस्थितीत रशियाने भारताकडे सुमारे ५०० उत्पादनांची यादी सोपविली असून याचा पुरवठा करण्याची मागणी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारतानेही रशियाला आपण पुरवठा करू शकणाऱ्या उत्पादनांची यादी दिल्याचे स्पष्ट केले. यामुळे भारत व रशियामधील द्विपक्षीय व्यापारात भारताला सहन करावी लागणारी तूट कमी होईल.

युक्रेनेचे युद्ध पेटल्यानंतर, अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. याचा रशियाच्या उत्पादन क्षेत्रावर परिणाम होऊ लागला असून रशियाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध भागांपासून ते इतर आवश्यक उत्पादनांसाठी रशियाने भारताकडे सहाय्य मागितले आहे. यानुसार रशियाने भारताकडे सुमारे ५०० उत्पादनांची यादी सोपविल्याचा दावा करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. भारताने देखील रशियाला पुरवठा करता येऊ शकणाऱ्या उत्पादनांची यादी तयार केली असून त्यासाठी रशियाने आपली बाजारपेठ भारताला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेतच जयशंकर यांनी ही माहिती दिली. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी सुरू केली आहे. तसेच भारत फार आधीपासूनच रशियाकडून शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची खरेदी करीत आला आहे. यामुळे भारत व रशियाच्या द्विपक्षीय व्यापारात भारताला फार मोठी तूट सहन करावी लागत असल्याचे दिसते. ही तूट भरून काढण्यासाठी भारताने रशियन बाजारपेठ आपल्या उत्पादनांना उपलब्ध व्हावी, असे आवाहन केल्याचे दिसते. रशियाकडून भारताची ही मागणी मान्य होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचवेळी सदर पत्रकार परिषदेत बोलताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुढच्या काळातही भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करीतच राहिल, असे स्पष्ट केले.

भारत आपल्या मागणीनुसार इंधनाची खरेदी करीत असून याबाबतचा निर्णय भारतीय इंधनकंपन्या बाजारपेठेतील घडामोडी लक्षात घेऊन घेतात, याची जाणीवही यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. दरम्यान, युरोपिय देशांनी युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये, अशी मागणी केली होती. भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करून युक्रेनवर हल्ले चढविण्यासाठी रशियाला पैसे पुरवित असल्याचा ठपका युरोपिय देशांनी ठेवला होता. मात्र भारत महिन्याभरात रशियाकडून जितके इंधन खरेदी करतो, तितके इंधन युरोपिय देश अर्ध्या दिवसातच रशियाकडून खरेदी करतात, असे सांगून भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपिय देशांच्या आक्षेपाला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

English हिंदी

leave a reply