इराणने युरेनियम संवर्धनाची क्षमता तिपटीने वाढविली

- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांचा इशारा

युरेनियम संवर्धनाची क्षमतातेहरान/व्हिएन्ना – ‘इराणने शुद्ध युरेनियम संवर्धनाची क्षमता दुप्पटीने नाही तर तिपटीने वाढविली आहे. इराणनेच ही माहिती आयोगाला दिली. अणुबॉम्ब निर्मितीसाठी ९० टक्के इतक्या प्रमाणात शुद्ध युरेनियमचे संवर्धन आवश्यक असते. इराणने ६० टक्के शुद्ध युरेनियमचे संवर्धन करण्याची क्षमता तिपटीने वाढविल्याने, इराणचा अणुकार्यक्रम आता नागरी राहिला नसून तो लष्करी पातळीवर पोहोचू लागला आहे. ही बाब सामान्य नसून इराणच्या या हालचालींचे गंभीर परिणाम संभवतात’, असा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर २४ तास उलटत नाहीत, तोच इराणने नव्या अणुप्रकल्पाची घोषणा केली आहे.

२०१५ साली अमेरिकेने इराणबरोबर केलेल्या प्रसिद्ध अणुकरारानुसार ३.६७ टक्के शुद्ध इतक्या प्रमाणात युरेनियमचे संवर्धन करण्याला परवानगी आहे. ही मर्यादा पाळल्यास इराणवरील निर्बंध शिथिल करून अतिरिक्त सहाय्य पुरविण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर इराणमधील फोर्दो व इतर अणुप्रकल्प फक्त युरेनियमवर संशोधन करण्यासाठी वापरले जातील, अशी सूचना करण्यात आली होती. पण गेल्या काही महिन्यांपासून इराणने या अणुकरारातील नियमांचे उघड उल्लंघन सुरू केल्याचा आरोप इस्रायल व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग करीत आहेत.

युरेनियम संवर्धनाची क्षमतागेल्याच महिन्यात इराणने फोर्दो येथील भुयारी अणुप्रकल्पात ‘आयआर-६’च्या सहाय्याने युरेनियमचे संवर्धन सुरू केले. याद्वारे इराणने अणुकराराचे आणखी एकदा उल्लंघन केल्याची टीका आयोगाने केली होती. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून इराणच्या आण्विक हालचालींवर ताशेरे ओढले होते. पण इराणमधील राजवटीच्या विरोधात पेटलेल्या आंदोलनामुळे अणुकार्यक्रमाच्या वादाकडे दुर्लक्ष झाले होते. अशा काळात इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत आयोगाला महत्त्वाची माहिती दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख ग्रॉसी यांनी सदर माहिती जगासमोर उघड केली. युरेनियम संवर्धनाची वाढती क्षमता इराणला अणुबॉम्बनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या जवळ नेत असल्याचा दावा ग्रॉसी यांनी केला. तसेच इराणने अणुप्रकल्पांची पाहणी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रॉसी यांनी केली. इराणच्या अणुकार्यक्रमातील ही प्रगती लक्षवेधी बाब ठरत असून याचे गंभीर परिणाम संभवतात, असा इशारा देऊन ग्रॉसी यांनी पाश्चिमात्य देशांना दिला व इराणविरोधात कारवाईसाठी आवाहन केले.

अमेरिका किंवा युरोपिय देशांकडून यावर मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. पण रशियाने इराणवरील निर्बंध मागे घेण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी इराणने कुझेस्तान प्रांतातील करून या भागात नव्या अणुप्रकल्पाची निर्मिती सुरू केल्याचे जाहीर केले. दोन अब्ज डॉलर्सचा अणुप्रकल्प पूर्ण होण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी जाईल, असा दावा इराणने केला. त्याचबरोबर २०१५ सालच्या अणुकरारातून माघार घेण्यासाठी अमेरिका इराणवर दबाव टाकत असली तरी त्यासमोर इराण अजिबात झुकणार नाही, असे इराणने बजावले होते.

English हिंदी

leave a reply