निदर्शकाला फाशी झाल्यानंतर इराणमधील आंदोलन चिघळण्याची शक्यता बळावली

फाशीतेहरान – निदर्शनांच्या आरोपाखाली अटक झालेल्या एकाला इराणच्या राजवटीने फाशी दिल्याची घोषणा केली. रिव्होल्युशनरी न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या अन्य निदर्शकांना देखील लवकरच फाशी देणार असल्याचे इराणने स्पष्ट केले. पण या घटनेनंतर इराणमधील राजवटविरोधी आंदोलनाची धार वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या बहिणीनेच पत्राद्वारे आपल्या भावाच्या राजवटीविरोधात बंड पुकारले आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या जवानांनी शस्त्रे खाली ठेवावी, असे आवाहन खामेनी यांच्या बहिणीने केले आहे.

काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला अली खामेनी यांची भाची फरीदेह मोरादखानी यांनी हिजाबसक्तीच्या विरोधात भडकलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच जगभरातील देशांना इराणबरोबरचे संबंध तोडण्याचे आवाहन केले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी फरीदेह यांना अटक केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे खामेनी यांची भाचीच इराणमधील राजवटीच्या विरोधात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

फाशीतर आता खामेनी यांची बहिण बद्री हुसैनी खामेनी यांनी फ्रान्सस्थित आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रात इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचे समर्थन केले. ‘इराणमधील इस्लामी क्रांतीचे जनक रुहोल्ला खोमेनी आणि त्यांच्यानंतर इराणची सूत्रे हाती घेणारा माझा भाऊ अली खामेनी यांनी इराणी जनतेला फक्त दु:ख दिले आणि त्यांच्यावर अत्याचारच केले. इराणच्या जनतेला स्वातंत्र्य, समृद्धी हवी असून त्यासाठी त्यांनी केलेला हा उठाव न्याय्य ठरतो’, अशी जळजळीत टीका बद्री खामेनी यांनी केली.

‘जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणारा माझा भाऊ आदराचा पात्र ठरत नाही. खोमेनीपासून खामेनीपर्यंतच्या कार्यकाळात इराणी जनतेवर झालेल्या अन्यायाचा मी जाहीर निषेध करते. अली खामेनीच्या नियंत्रणाखाली असलेले रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स आणि इतर कंत्राटी जवानांनी वेळीच शस्त्र खाली ठेवून या निदर्शनात सहभागी व्हावे, अन्यथा फार उशीर झालेला असेल’, असा इशारा बद्री खामेनी यांनी दिला. तर इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खातामी यांनी देखील हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचे स्वागत केले. तसेच खामेनी यांच्या राजवटीने निदर्शकांच्या मागण्यांवर विचार करावा, असे खातामी यांनी सुचविले आहे.

फाशी16 सप्टेंबर रोजी माहसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू झाली. अवघ्या काही दिवसात संपूर्ण इराणमध्ये पसरलेल्या या निदर्शनांमध्ये शाळा-कॉलेजमधील विद्यार्थीनींपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता. यावेळी निदर्शकांना पांगविण्यासाठी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी केलेल्या कारवाईत चारशेहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तर निदर्शकांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे जवान मारले गेल्याचा आरोप इराण करीत आहे.

इराण अस्थिर करण्यासाठी अमेरिका, इस्रायल व सौदी अरेबियाने हा हिंसाचार सुरू केल्याचा ठपका ठेवून इराणने निदर्शकांना दहशतवादी घोषित केले होते. तसेच याप्रकरणी 16 हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले होते. गेल्या महिन्यात यातील काही जणांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती. यापैकी इराणमधील मानवाधिकार कार्यकर्ता मोहसिन शेकारी याला गुरुवारी सकाळी फाशी दिल्याची घोषणा इराणच्या यंत्रणांनी केली. दहशत निर्माण करण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आलेल्या इतरांना देखील लवकरच फाशी देणार असल्याचे न्याय विभागाचे प्रमुख घोलम हुसेन मोहसिन-एजेई यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शेकारी याला दिलेल्या फाशीनंतर इराणमध्ये निदर्शनांचा नवा भडका उडण्याची शक्यता वर्तविली जाते.

हिंदी

leave a reply