‘एलएसी’वरील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केल्यास चीनबरोबरील भारताचे संबंध सुरळीत होण्याची शक्यता नाही

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – नियंत्रण रेषेवरील (एलएसी) स्थिती बदलण्यासाठी चीनने एकतर्फी प्रयत्न सुरू ठेवल्यास भारत व चीनमधील संबंध सुरळीत होण्याची शक्यता नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. एलएसीवरील स्थितीबाबत भारताची भूमिका चीनसमोर अत्यंत स्पष्ट स्वरुपात मांडण्यात आली असून कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री चीनबाबतची भूमिका मांडत असतानाच, चीनचे हेरगिरी करणारे जहाज हिंदी महासागर क्षेत्रात दाखल झाले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये भारताच्या सागरी हद्दीनजिक चीनचे हेरगिरी जहाज आढळण्याची ही तिसरी घटना ठरते.

S. Jaishankarराज्यसभेत भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एस. जयशंकर यांनी चीनच्या मुद्यावर ठाम शब्दात भूमिका स्पष्ट केली. ‘राजनैतिक पातळीवर भारताने अतिशय स्वच्छ व ठोस शब्दात आपले धोरण मांडले आहे. एलएसीवरील परिस्थिती बदलण्यासाठी चीनने एकतर्फी कारवाया केल्यास भारत ते खपवून घेणार नाही. चीनने आपली लष्करी तैनाती वाढवली व प्रयत्न सुरू ठेवलेच तर ती सीमाप्रश्नाबाबत अत्यंत गंभीर बाब ठरेल आणि अशा स्थितीत चीनबरोबरील संबंध सुरळीत होण्याची शक्यताच नाही’, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले.

गेल्या काही वर्षात भारत व चीनमधील संबंध सुरळीत राहिलेले नाहीत, याकडेही भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. पण दोन्ही देशांच्या लष्करामध्ये अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहेत व पुढेही चालू राहतील, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारताचे परराष्ट्रमंत्री राज्यसभेत चीनबाबतची भूमिका मांडत असतानाच चीनचे हेरगिरी जहाज ‘युआन वँग ५’ हिंदी महासागर क्षेत्रात दाखल झाले आहे. अलिकडच्या काळात चीनच्या हेरगिरी जहाजाने भारताच्या सागरी हद्दीनजिक दाखल होण्याची ही तिसरी वेळ ठरते. अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी भारताने केली असून या क्षेपणास्त्राच्या नोंदी घेण्यासाठी चीन आपली हेरगिरी करणारी जहाजे भारताच्या हद्दीनजिक पाठवित असल्याचे उघड झाले आहे.

५५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अग्नी-५च्या कक्षेत चीनचा बहुतांश भूभाग येत असून त्यामुळे चीनने या क्षेपणास्त्राच्या चाचणीची गंभीर दखल घेतल्याचे दिसते. भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम चीनपेक्षा खूपच मागे असल्याचे दावे करणाऱ्या चीनने अग्नी-५चा धसका घेतल्याचे यामुळे उघड झाले असून चीनची अस्वस्थता या देशाच्या असुरक्षिततेच्या भावनेबद्दल बरेच काही सांगून जात आहे.

leave a reply