युक्रेनच्या जनतेने विनाशकारी हिवाळ्यासाठी सज्ज रहावे

राजधानी किव्हचे मेयर विताली क्लिश्को यांचा इशारा

devastating winterकिव्ह – ‘राजधानी किव्हमधील वीजपुरवठ्यासह पाणी व उष्णता निर्माण करणारी यंत्रणा ठप्प होऊ शकते. तापमानातील मोठ्या घसरणीमुळे घरात राहणेही अशक्य होऊ शकते. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये दाखविल्याप्रमाणे विनाशकारी स्थिती ओढविण्याची शक्यता आहे’, असा इशारा युक्रेनची राजधानी किव्हचे मेयर विताली क्लिश्को यांनी दिला. किव्हमधील जनतेने आपत्कालिन स्थितीत शहर ताबडतोब सोडण्याची तयारी ठेवावी, असेही क्लिश्को यांनी बजावले. त्याचवेळी युक्रेनमधील वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करणे अशक्य असल्याची कबुली राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे.

Mayor Vitali Kliयुक्रेनने क्रिमिआतील ब्रिजवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनवर मोठे क्षेपणास्त्रहल्ले सुरू केले होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रशियाने युक्रेनला लक्ष्य करणारे आठ मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यात हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचाही वापर करण्यात आला. रशियाच्या या माऱ्यामुळे राजधानी किव्हसह युक्रेनच्या बहुतांश प्रांतांमधील वीजपुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. युक्रेनमधील ऊर्जा कंपन्या व इतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास ४० टक्के वीजपुरवठा यंत्रणा नष्ट झाली आहे.

ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे तसेच पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र रशियाकडून सातत्याने सुरू असणाऱ्या हल्ल्यांमुळे त्याला यश मिळालेले नाही. अमेरिका व युरोपिय देशांनी मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले असले तरी तात्पुरती हिटिंग स्टेशन्स उभारण्याव्यतिरिक्त युक्रेनला विशेष सुविधा पुरविता आलेल्या नाहीत. त्यामुळे युक्रेनने देशातील प्रमुख शहरांमधून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू केले आहे. युरोपिय महासंघाने आपल्या सदस्य देशांना युक्रेनी निर्वासितांचे नवे लोंढे स्वीकारण्यासाठी तयार रहावे, असे आवाहनही केले आहे.

या पार्श्वभूमीवर किव्हचे मेयर तसेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेल्या वक्तव्यांनी युक्रेनमधील जनतेच्या दारुण व भयावह स्थितीचा मुद्दा ऐरणीवर येत असल्याचे दिसत आहे.

leave a reply