चीनच्या 18 बॉम्बर्सची तैवानच्या हद्दीजवळून गस्त

18 bombersबीजिंग/तैपेई – चीन आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये संबंध सुधारण्याबाबत चर्चा सुरू असताना, अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या चीनच्या 18 बॉम्बर विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीजवळून उड्डाण केले. याआधी चीनच्या बॉम्बर व लढाऊ विमानांनी मोठ्या संख्येने तैवानच्या हवाई सुरक्षेला आव्हान दिले होते. पण पहिल्यांदाच चीनने एवढ्या मोठ्या संख्येने बॉम्बर विमाने रवाना करून तैवानला इशारा दिल्याचे दिसते.

जपानच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी नुकताच तैवानचा दौरा करून तैवानबरोबरचे लष्करी सहकार्य दृढ करण्याची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनच्या बॉम्बर विमानांनी तैवानच्या हद्दीजवळून केलेले उड्डाण लक्षवेधी ठरते. या उड्डाणाद्वारे चीन इतर देशांबरोबर लष्करी सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या तैवानला संदेश देऊ पाहत असल्याचे दिसते.

bombers patrolगेल्या वर्षभरात चीनने तैवानच्या हवाई हद्दीजवळून लढाऊ व बॉम्बर विमानांची गस्त तसेच घुसखोरी वाढविली आहे. चीनच्या 40 हून अधिक विमानांनी एका दिवसात तैवानला आव्हान देत धोकादायकरित्या उड्डाण केल्याचे उघड झाले होते. पण सोमवार ते मंगळवार असे चोवीस तास चीनच्या 21 विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीजवळून गस्त घातली.

यामध्ये 18 एच-6 या लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांचा समावेश होता. ही बॉम्बर विमाने अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. या धोकादायक हालचालींबरोबर, चीनने तैवानच्या दौऱ्यावर आपल्या राजकीय नेत्यांना पाठविणाऱ्या जपानवर सडकून टीका केली. तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग असून जपानच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या बेटाचा दौरा करून चीनबाबत अनादर प्रदर्शित केल्याची टीका चीनच्या सरकारी मुखपत्राने केली आहे.

दरम्यान, तैवानमधील लोकशाहीवादी सरकारला लक्ष्य करण्यासाठी चीन परदेशातील तैवानी नेत्यांना लक्ष्य करू शकतो, असा इशारा तैवानमधील मानवाधिकार संघटनेच्या अधिकाऱ्याने दिला. चीनमधील सरकारी माध्यमे तसे संकेत देत असल्याचे तैवानी अधिकाऱ्याने म्हटले आहे.

leave a reply