सायबर क्षेत्र, सोशल मीडियाद्वारे दहशतवाद माजविण्याचा धोका वाढला

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय

नवी दिल्ली – सायबर क्षेत्र व सोशल मीडियाचा वापर करून दहशतवादी हल्ले घडविण्याचा धोका पूर्वी कधीही नव्हता, इतक्या प्रमाणात वाढला आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे. सीमेचे बंधन नसलेल्या सायबर क्षेत्राद्वारे भारताशी वैर असलेल्या देशांच्या गुप्तचर संस्था कट्टरवाद व अपप्रचाराला खतपाणी घालत आहेत. ही देशाच्या सार्वभौमत्त्व व अखंडतेसाठी घातक बाब ठरते, याचीही जाणीव केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी करून दिली.

cyber-sectorलोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हा धोका अधोरेखित केला. व्हर्च्युअल पातळीवर असलेले सायबर क्षेत्र व सोशल मीडियाचा विस्तार सीमेच्या पलिकडे जातो. यामार्फत चुकीची माहिती किंवा अपप्रचार करणारा, कट्टरवाद पसरविणारा कुणीही अज्ञात राहू शकतो. त्यातच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही माहिती पसरविण्याचा वेग अतिशय वाढला आहे. म्हणूनच सायबर क्षेत्र व सोशल मीडियाचा वापर करून दहशतवादी हल्ले घडविण्याचा धोका वाढला असून पूर्वी कधीही नव्हता अशा पातळीवर हा धोका पोहोचल्याचे नित्यानंद राय म्हणाले.

भारताशी वैर असलेल्या देशांच्या गुप्तचर संस्था सायबर क्षेत्र व सोशल मीडियाचा कट्टरवाद पसरविण्यासाठी वापर करीत आहेत, याकडे राय यांनी लक्ष वेधले. मात्र देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी नजर सायबर व सोशल मीडियावर आहे. अशा स्वरुपाच्या देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या बेकायदेशीर कारवाया करणाऱ्यांना कडक शासन केले जाईल, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिला. भारतीय दंडविधान संहितेच्या सेक्शन 69ए, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 नुसार सोशल मीडिया अकाऊंटस्‌‍वरून बेकायदेशीर व कुटील हेतूने प्रसारित केलेल्या मजकूरावर कठोर कारवाई करून हा मजकूर ब्लॉक केला जाऊ शकतो, अशी माहिती नित्यानंद राय यांनी दिली.

यासंदर्भातील गुन्हांचा प्रभावी तपास आणि त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी ‘एनआयए ॲक्ट 2008’मध्ये दुरूस्ती करण्यात आलेली आहे, याची आठवण नित्यानंद राय यांनी करून दिली. दरम्यान, याआधी सोशल मीडियावर तेढ माजविणारा विद्वेषी मजकूर प्रसिद्ध करणारी अकाऊंट्स पाकिस्तानातून हाताळली जात असल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यामुळे सायबर टेररीझमची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवली होती. गेल्याच महिन्यात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेत भारताने सोशल मीडियाचा वापर करून दहशतवाद पसरविण्याचे व दहशतवाद्यांसाठी पैसे जमविण्याचे कारस्थान आखले जात असल्याचा इशारा दिला होता.

‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या धोक्याची जगाला जाणीव करून दिली. तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील हा धोका अधोरेखित करून आंतरराष्ट्रीय समुदायाने याच्या धोक्याविरोधात एकजूट करावी, असे आवाहन केले होते.

leave a reply