हिजाबसक्तीच्या विरोधातील निदर्शनांवरून इराणच्या राजवटीमध्ये गंभीर मतभेद

- रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांचा दावा

हिजाबसक्तीच्यातेहरान – गेल्या 108 दिवसांपासून हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या मुद्यावरुन इराणमधील राजवट तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समध्येच मतभेद आहेत. यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेली निदर्शने यशस्वी ठरत असल्याचा ठपका रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या दोन अधिकाऱ्यांनी ठेवला. इराणच्या राजवटीवर निष्ठा असलेल्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते.

इराणमध्ये राजकीय सर्वाधिकार असलेले सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला अली खामेनी अपयशी ठरले असून ते इराणच्या सिद्धांतांसाठी योग्यरितीने खडे ठाकलेले नाहीत, असे इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटू लागले आहे. आत्तापर्यंत इराणमध्ये सर्वोच्च धर्मगुरूपदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करणे म्हणजे ईशनिंदेसारखा अपराध ठरतो, असे मानले जात होते. पण हिजाबसक्तीविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. खामेनी यांच्या निषेधार्थ उघडपणे घोषणा दिल्या जात आहेत. इतकेच नाही, तर खामेनी यांचे निकटवर्तीय देखील त्यांच्या विरोधात गेले असून त्यांच्या धोरणांवर असंतोष व्यक्त करीत आहेत. इराणच्या या दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे इराणच्या राजवटीची धोरणे राबवणारे व त्याच्या विरोधात जाणारे, असे दोन प्रवाह सध्या इराणमध्ये असल्याचे उघड झाले आहे.

हिजाबसक्तीच्याखामेनी यांच्या विचारांशी सहमत नसलेले नेते व अधिकाऱ्यांवर टीका करणारा अधिकाऱ्यांचा व्हिडिओ इराणमध्ये नुकताच व्हायरल झाला होता. इराणच्या ‘इमाम हुसेन ट्रेनिंग अँड ऑफिसर कॉलेज’चे माजी उप कमांडर हमिद अबाझारी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून निदर्शनांच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळणाऱ्यांवर कोरडे ओढले. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे काही अधिकारी राजवटविरोधी निदर्शनांचे मूक समर्थक होते, असा गंभीर आरोप अबाझारी यांनी केला. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रवक्त्यांनी माजी अधिकारी अबाझारी यांचा हा आरोप फेटाळला. पण निदर्शकांविरोधात कारवाईसाठी तैनात असलेले वरिष्ठ कमांडर घोलामहुसेन घेयपरवार यांनी देखील इराणच्या राजवटीतील काही उच्चभ्रू या निदर्शनांवर शांत होते, अशी टीका केली.

हिजाबसक्तीच्याया निदर्शनांवर टीका केली तर जगभरातील आपली प्रतिमा मलिन होईल, आपण बहिष्कृत होऊ, या भीतीने काही उच्चपदस्थ व्यक्ती निदर्शनांवर बोलत नव्हते, असा ठपका घेयपरवार यांनी ठेवला. ‘इराणसमोर आर्थिक समस्या आहेत, महागाई, बेरोजगारसारख्या इतरही प्रश्न आहेत. पण याचा अर्थ कुणीही येऊन इराणच्या राजवटीवर घाव घालू शकत नाही’, अशा शब्दात घेयपरवार यांनी सरकारविरोधी निदर्शक तसेच राजवटीतील त्यांच्या समर्थकांवर टीका केली. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या दोन अधिकाऱ्यांनी इराणच्या राजवटीतील या मतभेदांबाबत उघड केलेली माहिती अतिशय गंभीर घडामोड ठरते.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या राजवटविरोधी निदर्शनांमुळे इराणच्या राजकीय आणि सुरक्षा यंत्रणांना मोठे तडे गेल्याचा दावा ‘अमेरिकन इंटरप्राईजेस इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाच्या ‘क्रिटिकल थ्रेट्स प्रोजेक्ट’ने केला. तर राजवटविरोधात यशस्वी ठरलेल्या या निदर्शनांमुळे इराणच्या जनतेतील लष्कर आणि पोलिसांबद्दलची भीती निघून गेल्याचा इशारा इराणच्या वृत्तसंस्थेने दिला होता. तर येत्या काळात या निदर्शनांपासून प्रेरणा घेतलेली इराणी जनता आर्थिक सुधारणांसाठी याहून अधिक आक्रमक निदर्शने छेडू शकतात, असा दावा इराणच्या सर्वोच्च नेत्यांना सल्ला देणाऱ्या काऊन्सिलचे सदस्य मोहम्मद सद्र यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

leave a reply