आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशिया-जपान द्विपक्षीय व्यापारात वाढ

व्यापारात वाढटोकिओ/मॉस्को – जगातील प्रगत देशांचा गट असणाऱ्या ‘जी7’सह इतर पाश्चिमात्य देशांनी टाकलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रशिया व जपानमधील व्यापारात वाढ झाल्याचे समोर आले आहे. 2022 सालातील पहिल्या 11 महिन्यांमध्ये दोन देशांमधील व्यापार तब्बल 18 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. या वाढीमागे इंधनदरांचा भडका व इंधननिर्यातीत पडलेली भर हे घटक कारणीभूत ठरल्याचे समोर आले. रशियाच्या साखलिन इंधनप्रकल्पात जपानी कंपन्यांची गुंतवणूक असून जपान सरकारने आपल्या विमा कंपन्यांनाही ‘एलएनजी टँकर्स’ना विम्याची सुविधा पुरविण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. यात जपान, ऑस्ट्रेलिया यासारखे देशही सहभागी झाले होते. जपान हा ‘जी7’ गटाचा भाग असून या गटाने रशियाच्या इंधन तसेच वित्त क्षेत्रावर निर्बंध टाकण्यासाठी पुढाकार घेतला होता. रशियन इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणण्याचा प्रस्तावही ‘जी7’नेच पहिल्यांदा मंजूर केला होता. या निर्बंधांमुळे रशियन इंधनाची मागणी काही प्रमाणात घटल्याचे दावेही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर रशिया व जपानमधील व्यापारात वाढ होण्याची बातमी आश्चर्यकारक ठरते.

व्यापारात वाढ2022 सालच्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये रशिया व जपानमधील व्यापार 18 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. यात रशियाकडून होणाऱ्या इंधननिर्यातीचा वाटा सर्वाधिक आहे. रशियाने जपानला जवळपास 14 अब्ज डॉलर्सचे इंधन निर्यात केले आहे. यात कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायूचा समावेश आहे. जपानकडून होणाऱ्या इंधनआयातीतील नऊ टक्के वाटा रशियन इंधनाचा आहे. जपानमध्ये होणाऱ्या ऊर्जानिर्मितीपैकी तीन टक्के ऊर्जेचे उत्पादन रशियन इंधनवायूवर अवलंबून आहे. त्यामुळे ‘जी7’कडून लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतरही जपानने रशियन इंधनवायूची आयात कायम ठेवली आहे.

रशियाच्या साखलिन या इंधनप्रकल्पात जपानी कंपन्यांची भागीदारी असून ही गुंतवणूकदेखील जपानने कायम ठेवली आहे. त्याचवेळी रशियन इंधनाच्या आयातीसाठी जहाजांना युद्ध विमा पुरविण्यासाठी जपानी कंपन्यांना निर्देश देण्यात आल्याचे वृत्तही समोर आले आहे. इंधनाची आयात जपान सरकारसाठी प्राधान्यक्रम असल्याने जपानी कंपन्यांनी युद्ध विम्याची सुविधा कायम ठेवावी, असे पत्र जपान सरकारने संबंधित कंपन्यांना पाठविल्याचे सांगण्यात येते. जपानमधील तीन कंपन्यांकडून इंधनआयात करणाऱ्या जहाजांना विमा पुरविण्यात येतो. यात ‘टोकिओ मरिन ॲण्ड निकिडो फायर इन्शुरन्स’, ‘सोम्पो जपान इन्शुरन्स’ व ‘मित्सुई सुमितोमो इन्शुरन्स’ यांचा समावेश आहे.

leave a reply