जेरूसलेम – इराणच्या नौदलाने इस्रायलच्या दक्षिणेकडील ‘इलाट’ नौदल तळ व विनाशिकांची प्रतिकृती उभारून त्यावर ड्रोन हल्ले चढविण्याचा सराव केला आहे. गेल्या आठवड्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या युद्धसरावात ही मॉक ड्रिल करण्यात आली होती, अशी माहिती इस्रायली वर्तमानपत्राने दिली. याद्वारे इराणने इस्रायलला धमकावल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्रे करीत आहेत.
गेल्या आठवड्यात होर्मुझच्या आखातात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा ‘झोल्फकार 1401’ हा सराव पार पडला होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. या युद्धसरावामध्ये इराणने क्षेपणास्त्रांबरोबरच ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याच सरावात इराणने ‘अबाबिल-5’ या आत्मघाती ड्रोनचा वापर करून ‘हेंगम’ श्रेणीतील जहाजाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली. सदर जहाज इस्रायलच्या इलाट नौदल तळावर तैनात असल्याचे चित्र इराणने उभे केले होते.
इराणने आपल्या ड्रोन्सच्या क्षमतेत प्रचंड वाढ केल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. इराक, सिरिया तसेच येमेनमधील दहशतवादी संघटना इराणच्या ड्रोन्सचा वापर करून हल्ले चढवित असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.