भारत-फ्रान्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली – फ्रान्सचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इमॅन्युअल बॉन भारताच्या भेटीवर आले आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा केली असून या चर्चेत इंडो-पॅसिफिक क्षेत्र, युक्रेनचे युद्ध, दहशतवादविरोधी कारवाया, सायबर सुरक्षा, अफगाणिस्तानातील परिस्थिती तसेच रफायल (एम) विमानांचा मुद्दा अग्रक्रमावर होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्त्वाच्या दावेदारीला फ्रान्सचा पाठिंबा असल्याचे बॉन यांनी यावेळी घोषित केले. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी व युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत व फ्रान्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये पार पडलेली चर्चा महत्त्वपूर्ण ठरते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

India-France National Security Advisorsभारत व फ्रान्समध्ये 36वी धोरणात्मक चर्चा पार पडली असून यासाठी भारतात आलेल्या फ्रान्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी, परराष्ट्रंमत्री जयशंकर यांची भेट घेतली. तसेच इमॅन्युअल बॉन पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी व युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत व फ्रान्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये पार पडलेली चर्चा महत्त्वपूर्ण ठरते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. तर या चर्चेत भारत व फ्रान्समधील धोरणात्मक सहकार्याच्या सर्वच मुद्यांचा समावेश होता, असा दावा फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन भारताच्या भेटीवर येणार असल्याचे दावे केले जातात. भारत फ्रान्सकडून आपल्या लष्करासाठी व नौदलासाठी रफायल विमाने खरेदी करणार आहे. हा करार फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीत संपन्न होईल, असे दावे केले जातात. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात फ्रान्सची बेटे असून चीनच्या या क्षेत्रातील बेलगाम कारवायांमुळे या बेटांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत या बेटांच्या सुरक्षेसाठी फ्रान्स भारताशी सहकार्य करण्यास उत्सुकता दाखवित आहे. त्यातच बायडेन प्रशासनाने स्वीकारलेल्या धोरणांमुळे चीनची या सागरी क्षेत्रातील आक्रमकता अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचे फ्रान्सबरोबरील धोरणात्मक सहकार्याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

अशा परिस्थितीत फ्रान्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भारतभेट व चर्चा लक्षवेधी बाब ठरते. विशेषतः रफायल लढाऊ विमानांबाबत दोन्ही देशांमध्ये विकसित होत असलेले सहकार्य एकाच वेळी इतर सर्व प्रमुख देशांच्या चिंतेचे कारण बनले आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन हे देश भारताला लढाऊ विमाने पुरविण्यासाठी उत्सुक असताना, या आघाडीवर फ्रान्सला मिळालेले यश या देशांना खुपणारे असल्याचा दावा केला जातो.

leave a reply