तेहरान – जवळपास चार महिन्यांपासून इराणमधील राजवटीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना समर्थन देणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्ष अकबर रफ्संजानी यांच्या मुलीला इराणने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर ईशनिंदेचा व ईश्वरद्रोहाचा आरोप ठेवून इराणने तीन निदर्शकांना फाशीची शिक्षा जाहीर केली. ही निदर्शने इराणमधील सरकारचे काहीही वाकडे करू शकली नसल्याचे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी म्हटले आहे. पण माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीला शिक्षा सुनावून इराणच्या राजवटीने नेतृत्वशिवाय सुरू असलेल्या निदर्शनांना स्वतःहून चेहरा मिळवून दिल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.
इराणच्या राजवटीने अटकेत असलेल्या निदर्शकांविरोधातील शिक्षेची कारवाई तीव्र केली आहे. आत्तापर्यंत 100 हून अधिक जणांना फाशी सुनाविण्यात आली असून यामध्ये फुटबॉलपटू तसेच काही कलाकारांचा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी इराणच्या राजवटीने प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची सुटका केली होती. पण मंगळवारी इराणच्या यंत्रणांनी फैझेह हाशेमी यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावून खळबळ माजविली. फैझेह या इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अकबर रफ्संजानी यांच्या कन्या आहेत.
गेल्या वर्षी इराणमधील व्यवस्थेविरोधात अपप्रचार केल्याचा फैझेह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आला आहे. पण इराणच्या राजवटीविरोधात निदर्शकांना चिथावणी दिल्याचा ठपका ठेवून यंत्रणांनी तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यामुळे राजवटीच्या विरोधात भडकलेला असंतोष शमविण्यासाठी इराणच्या यंत्रणांनी फैझेह यांच्यावरील आरोपांची तसेच शिक्षेची तीव्रता कमी केल्याचा दावा केला जातो. मात्र फैझेह यांना शिक्षा ठोठावून इराणच्या राजवटीने निदर्शकांना नेतृत्व मिळवून दिल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराणच्या राजवटीने खोटे आरोप करून मोहम्मद मेहदी करामी आणि सईद मोहम्मद हुसेनी यांना फाशी दिली, असा ठपका ब्रिटनने ठेवला आहे. या प्रकरणी ब्रिटनने इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्याला समन्स बजावले. तर इराणच्या राजवटीने निदर्शकांना ठोठावलेल्या फाशीला विरोध करण्यासाठ तुरूंगाबाहेर निदर्शकांनी गर्दी केली आहे. इराणच्या या कारवाईविरोधात जगभरातून पडसाद उमटत आहेत. ब्रिटनसह इतर युरोपिय देशांमध्ये इराणच्या राजवटीचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.
हिंदी