2023 मध्ये अफगाणिस्तानात चिनी नागरिकांवरील हल्ले तीव्र होतील

- आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा इशारा

चिनी नागरिकांवरील हल्लेहाँगकाँग – ‘‘गेल्या महिन्यात ‘आयएस-खोरासान’च्या दहशतवाद्यांनी काबुलच्या हॉटेलमध्ये चिनी नागरिकांवर चढविलेला हल्ला, ही केवळ झलक होती. येत्या वर्षात अफगाणिस्तानात दाखल झालेल्या चिनी नागरिकांवरील हल्ले अधिक तीव्र होतील. चीनची कम्युनिस्ट राजवट झिंजियांगमधील उघूरवंशियांवर करीत असलेल्या अमानवी अत्याचाराचा सूड घेण्यासाठी आयएसचे दहशतवादी चिनी नागरिकांना लक्ष्य करत राहतील’’, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला.

झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांना चीनची कम्युनिस्ट राजवट लक्ष्य करीत आहे, उघूरवंशिय पुरुषांना छळछावणीत डांबून त्यांच्यावर अत्याचार करीत आहे. चीनची राजवट कारस्थानद्वारे उघूरवंशियांचे अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा आरोप होत आहे. चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळून आंतरराष्ट्रीय निरिक्षकांना झिंजियांगच्या दौऱ्यासाठी आमंत्रित केले आहे. या निरिक्षकांनी देखील आपल्याला क्लिन चिट दिल्याचा दावा चीन करीत आहे. पण चीनने उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर केल्या जाणाऱ्या अनन्वित अत्याचाराचेे पडसाद अफगाणिस्तानात उमटतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत.

चिनी नागरिकांवरील हल्लेयासाठी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण या विश्लेषकांनी करुन दिली. ‘आयएस-खोरासन’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. चिनी व्यावसायिक, राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांची गर्दी असलेल्या काबुलमधील हॉटेलवर आयएसच्या दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात पाच चिनी नागरिक गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला म्हणजे चीनसाठी इशारा होता, असा दावा ब्रिटनस्थित ‘इस्लामिक थिओलॉजी ऑफ काऊंटर टेररिझम-आयटीसीटी’ या अभ्यासगटाच्या दक्षिण आशिया दहशतवाद विभागाचे संचालक फरान जेफ्री यांनी केला.

तालिबानच्या राजवटीशी सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या चीनच्या अफगाणिस्तानातील हितसंबंधांवर यापुढेही असेच हल्ले सुरू राहतील, असे जेफ्री यांनी बजावले. ‘आयएसच्या मते, चीनची कम्युनिस्ट राजवट नास्तिक असून ही राजवट चीनमधील उघूर मुस्लिमांवर अत्याचार करते. या चिनी राजवटीने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहे. यामुळे अफगाणिस्तानातील चीनच्या हितसंबंधांवर हल्ले चढविणे योग्यच असल्याचे आयएसला वाटत आहे’, असा इशारा जेफ्री यांनी दिला. हाँगकाँगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वर्तमानपत्राने हा इशारा प्रसिद्ध केला.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून चीनने या देशात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. गेल्याच महिन्यात 500 चिनी व्यापारी अफगाणिस्तानात दाखल झाल्याचा दावा केला जातो. तसेच तालिबानबरोबर सहकार्य प्रस्थापित करुन आंतरराष्ट्रीय स्तरातून तालिबानच्या राजवटीला मान्यता प्राप्त करून देण्याचे आश्वासनही चीनने दिले आहे. पण त्याआधी तालिबानने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी अट चीनने तालिबानच्या नेत्यांसमोर ठेवलेली आहे.

चीनच्या राजवटीसाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट-ईटीआयएम’ या दहशतवादी संघटनेवर तालिबानने कारवाई करावी. उघूरवंशियांतील कट्टरपंथियांचा समावेश असलेल्या या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानच्या बडाखशान तसेच फरयाब आणि नूरीस्तान प्रांतात तळ उभारले आहेत. तालिबानने हे तळ उद्ध्वस्त केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानच्या राजवटीला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन चीनने दिले आहे. पण उघूरांवरील अत्याचारामुळे संतापलेले आयएसचे दहशतवादी अफगाणिस्तानातील चिनी नागरिकांना लक्ष्य करू शकतात, ही बाब हार्वर्ड केनेडी स्कूलचे प्राध्यापक निशांक मोटवानी यांनी लक्षात आणून दिली आहे.

English हिंदी

leave a reply