अमेरिका व जपानमध्ये ‘स्पेस फ्रेमवर्क ॲग्रीमेंट’वर स्वाक्षऱ्या

‘स्पेस फ्रेमवर्क ॲग्रीमेंट’वॉशिंग्टन/टोकिओ – अमेरिका व जपानमध्ये अंतराळक्षेत्रातील सहकार्य अधिक भक्कम करणाऱ्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा व अमेरिकेची अंतराळसंस्था ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. चीन व रशिया अंतराळक्षेत्रातील सहकार्य वाढवित असतानाच जपानने अमेरिकेबरोबर अंतराळ क्षेत्रात नवा करार करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. काही दिवसांपूर्वीच अमेरिका व जपानमध्ये झालेल्या ‘टू प्लस टू’ बैठकीत अंतराळातून होणाऱ्या तसेच अंतराळात होणाऱ्या हल्ल्यांपासून असलेल्या धोक्यांचा अमेरिका व जपानच्या संरक्षणकरारात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

चीन, उत्तर कोरिया व रशियाच्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर जपानने सर्व आघाड्यांवर आपली क्षमता व सज्जता वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्याभरात जपानने नवी ‘नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’ जाहीर करण्याबरोबरच संरक्षणखर्चात विक्रमी वाढ करण्याचाही निर्णय घेतला होता. यात चीन व उत्तर कोरियाला रोखण्यासाठी जगातील प्रमुख देशांबरोबर सहकार्य भक्कम करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जपानचे पंतप्रधान व इतर वरिष्ठ मंत्री आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत.

ब्रिटन व फ्रान्सला दिलेल्या भेटीनंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान किशिदा अमेरिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर अमेरिकी अंतराळसंस्था नासा तसेच जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीलाही भेट दिली. नासाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान, अमेरिका व जपानदरम्यान ‘स्पेस फ्रेमवर्क ॲग्रीमेंट’वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जपान व अमेरिकेत गेल्या अनेक दशकांपासून असलेले अंतराळ सहकार्य अधिक भक्कम करणे हा कराराचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.

जपान व अमेरिकेतील आघाडी अधिकाधिक मजबूत होत असून अंतराळक्षेत्रातील कराराही द्विपक्षीय सहकार्याची व्याप्ती वृद्धिंगत करणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी यावेळी दिली. नव्या करारानुसार, अमेरिकेच्या अंतराळमोहिमांमधील जपानचा सहभाग वाढविण्यात येणार असून ‘डीप स्पेस’मधील मोहिमांमध्येही जपानचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती अमेरिकी सूत्रांनी दिली. अमेरिकेने ‘आर्टेमिस’ या चांद्रमोहिमेची घोषणा केल्यानंतर त्याला समर्थन देणाऱ्या तसेच त्यात सहभागी होणाऱ्या देशांमध्ये जपान आघाडीवर होता.

गेल्या काही वर्षात चीन व रशियाने अंतराळक्षेत्रातील सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढविले असून चंद्रावर तळ उभारण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी चीनच्या इतर अंतराळ मोहिमांसाठी रशिया तांत्रिक सहकार्य पुरवित आहे. चीन व रशिया या दोन्ही देशांनी अंतराळात हल्ले चढविता येतील, असे तंत्रज्ञान तसेच यंत्रणा विकसित केल्याचेही सांगण्यात येते.

English हिंदी

leave a reply