हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर हवाई हल्ले चढविले

रॉकेटजेरूसलेम/गाझा – गुरुवारी रात्री गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविल्यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला. वेस्ट बँकमध्ये इस्रायली सुरक्षा यंत्रणा आणि पॅलेस्टिनींमधील संघर्षात दहा जणांचा बळी गेल्यानंतर हमासने हे रॉकेट हल्ले चढविले होते. यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझापट्टीत घुसून हमासची महत्त्वाची ठिकाणे नष्ट केली. हा संघर्ष सध्या इतक्यावरच थांबला असला, तरी पुढच्या काळात याचा नव्याने भडका उडेल, असा इशारा विश्लेषक देत आहेत. वेस्ट बँकच्या जेनिन प्रांतात निर्वासितांसाठी उभारलेल्या शिबिरात गुरुवारी पॅलेस्टिनी आणि इस्रायली सुरक्षा जवान यांच्यात वाद पेटला, असे कतारी व आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे. या वादाचे कारण उघड झालेले नाही. पण हा वाद विकोपाला जाऊन पेटलेल्या संघर्षात दहा पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचे सांगितले जाते. इस्रायली लष्कराच्या कारवाईत हे बळी गेल्यानंतर पॅलेस्टिनींच्या संतापाचा भडका उडाला. या संघर्षानंतर पॅलेस्टिनींच्या शिबिरापर्यंत वैद्यकीय सहाय्य देखील पोहोचू नये, यासाठी इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी कोंडी केल्याचा आरोप पॅलेस्टिनी गटांनी केला आहे. तसेच इस्रायली जवानांनी जेनिन येथील रुग्णालयात अश्रुधूराचा वापर केल्याचा ठपकाही या गटांनी ठेवला आहे.

रॉकेटइस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी हे आरोप फेटाळले. जेनिन येथील निर्वासितांच्या शिबिरात ‘इस्लामिक जिहाद’ या दहशतवादी संघटनेचे हस्तक दबा धरून बसले होते. हे दहशतवादी इस्रायलमध्ये मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी इस्रायली सुरक्षा जवानांनी जेनिनमध्ये कारवाई केली. यामध्ये इस्लामिक जिहादचे तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी दिली. इस्लामिक जिहाद ही गाझातील दहशतवादी संघटना असून गेल्या वर्षभरात वेस्ट बँकमधील अरब वस्त्यांमध्ये या संघटनेचा प्रभाव वाढल्याचा इशारा इस्रायली अभ्यासगटांनी दिला होता.

इस्रायली लष्कराच्या जेनिनमधील या कारवाईनंतर गुरुवारी रात्रीच गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट्सचे हल्ले झाले. एकूण पाच रॉकेट्सचा इस्रायलच्या दिशेने मारा करण्यात आला. गाझाच्या सीमेजवळ तैनात इस्रायलच्या आयर्न डोम हवाई सुरक्षा यंत्रणेने यापैकी तीन रॉकेट्स यशस्वीरित्या भेदले. तर एक रॉकेट इस्रायलच्या हद्दीत रिकाम्या मैदानात आणि शेवटचे रॉकेट गाझापट्टीतच कोसळले.

या रॉकेट्सच्या हल्ल्यांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण नेहमीप्रमाणे गाझातून होणाऱ्या या रॉकेट हल्ल्यांना इस्रायलने हवाई हल्ल्यांद्वारे उत्तर दिले. यावेळी इस्रायली लढाऊ विमानांनी गाझातील हमासचे रॉकेट निर्मितीचा भुयारी कारखाना तसेच प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले.
इस्रायलच्या या हवाई हल्ल्यानंतर गाझातून दुसरे रॉकेट हल्ले झालेले नाहीत. पण वेस्ट बँकमधील संघर्ष आणि गाझातून झालेले रॉकेट हल्ले हे इस्रायलचे पंतप्रधान

बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या सरकारसमोरील मोठे आव्हान ठरत असल्याचा इशारा इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. नेत्यान्याहू यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून वेस्ट बँकमध्ये आठवड्याच्या अखेरीस इस्रायलविरोधी निदर्शनांचे आयोजन केले जाते. यामध्ये इस्रायलविरोधी घोषणा देऊन कट्टरपंथीय नेते तरुणांना चिथावणी देत आहेत. ही बाब अतिशय गंभीर ठरते, असा इशारा इस्रायलमधील विश्लेषकांनी दिला आहे.

वेस्ट बँकमध्ये इस्रायलच्या विरोधात पॅलेस्टिनींमध्ये खदखदत असलेल्या असंतोषामुळे संघर्ष भडकू शकतो, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी काही आठवड्यांपूर्वी दिला होता. याकडे हे विश्लेषक लक्ष वेधत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन येत्या दोन दिवसात इस्रायल तसेच वेस्ट बँकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी जेनिनमध्ये झालेला हा संघर्ष व रक्तपात इस्रायलच्या नव्या सरकारसमोरील अडचणीत वाढ करणारा आहे.

leave a reply