अमेरिकेकडून युक्रेनला दोन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा

रशिया-युक्रेन संघर्ष थांबविण्यासाठी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष चीनला भेट देणार

French-President-Emmanuel-Macronवॉशिंग्टन/पॅरिस – रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच अमेरिकेने युक्रेनला दोन अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त शस्त्रसहाय्याची घोषणा केली आहे. या शस्त्रसहाय्यात ‘हायमार्स रॉकेटस्‌‍’, ‘लेझर गायडेड रॉकेट सिस्टिम्स’, चार विविध प्रकारचे ड्रोन्स व तोफगोळ्यांचा समावेश आहे. या शस्त्रपुरवठ्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवरच अमेरिका युक्रेनमध्ये अफगाणिस्तान मोहिमेपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचा दावा युरोपियन अभ्यासगटाने केला आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशिया-युक्रेन संघर्षातील तोडग्यासाठी चीनला भेट देणार असल्याचे जाहीर केले.

रशियाने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला चढविला होता. हा हल्ला होण्यापूर्वीच अमेरिकेने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू केला होता. त्यात युक्रेनी लष्कराला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचाही समावेश होता. अमेरिकेच्या लष्करी सल्लागारांची तुकडी 2014 नंतर युक्रेनमध्ये तैनात करण्यात आली होती. 2014 सालापासून दरवर्षी अमेरिका युक्रेनला सातत्याने संरक्षणसहाय्य जाहीर करीत आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिका जवळपास दर महिन्याला अब्जावधी डॉलर्सचे शस्त्रसहाय्य पुरवित आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला पुरविलेल्या शस्त्रपुरवठ्याचे मूल्य 46 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे सांगण्यात येते.

arms assistance to Ukraineया पार्श्वभूमीवरच अमेरिकेने युक्रेनला पुन्हा दोन अब्ज डॉलर्सच्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली आहे. त्यात रॉकेट सिस्टिम्स, ड्रोन्स, तोफगोळे, सुरुंगविरोधी यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर डिटेक्शन सिस्टिम यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त प्रशिक्षण तसेच देखभालीसाठीही निधीची तरतूद करण्यात आल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नव्या शस्त्रसहाय्याअंतर्गत पुरविण्यात येणारी शस्त्रे अमेरिकी संरक्षण विभागाच्या साठ्यातून देण्यात येणार नसून अमेरिकी संरक्षण कंपन्यांकडून पुरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एप्रिल महिन्यात चीनला भेट देण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने रशिया-युक्रेन संघर्ष थांबविण्यासाठी 12 कलमांचा समावेश असलेला प्रस्ताव जाहीर केला आहे. या प्रस्तावासंदर्भात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी चीनला भेट देणार असल्याचे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले. पाश्चिमात्य आघाडीतील अनेक देशांनी चीनच्या प्रस्तावावर शंका व्यक्त केली आहे. तर अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी, चीन रशियाला शस्त्रास्त्रे पुरविणार असल्याची ठोस माहिती अमेरिकेला मिळाल्याचे म्हटले आहे.

leave a reply