’जी २०’ परिषदेसमोर जागतिक अर्थव्यवस्थेला असलेले धोके कमी करण्याचे आव्हान

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

हैद्राबाद – आत्ताच्या काळातील सुरक्षेची संकल्पना केवळ आपला भूभाग व अंतर्गत सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षेपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर अन्नसुरक्षा, आरोग्यसुरक्षा याचाही समावेश आत्ताच्या काळातील सुरक्षाविषयक संकल्पनांमध्ये केला जातो. कोरोनाची साथ व युक्रेनच्या युद्धानंतर जगाला हा धडा मिळालेला आहे, असा दावा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला. अशारितीने सुरक्षित जगासाठी प्रयत्न करून उद्योग व जागतिक अर्थकारणाला संभवणारे धोके कशारितीने कमी करता येतील, यावर जी20 देशांनी गंभीरपणे विचार करायला हवा, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केली.

S Jaishankarहैद्राबादमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्र्यांनी सध्याच्या काळात सुरक्षेची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याची जाणीव करून दिली. कोरोनाची साथ, युक्रेनचे युद्ध आणि तुर्कीमधील भूकंपाचा दाखला आपल्या भाषणात परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. अशा संकटांपासून आपले उद्योगक्षेत्र व जागतिक अर्थव्यवस्थेला संभवणारे धोके कशारितीने कमी करता येतील, या जोखीम कमी करण्यासाठी काय करता येईल, यावर जी20 बैठकीत सर्वांनीच चिंतन करावे, अशी भारताची अपेक्षा असल्याचे परराष्ट्रंमत्री जयशंकर यांनी म्हटले आहे. याबरोबरच जी20 परिषद संपल्यानंतर, भारताची या संघटनेसंदर्भातील भूमिका संपुष्टात येणार नाही, अशी माहिती देखील जयशंकर यांनी दिली.

आधीच्या वर्षातील व त्याच्याही आधीच्या वर्षातील जी20चे अध्यक्ष असलेले देश चालू वर्षातील जी20च्या सदस्यदेशांशी वाटाघाटी करून समस्यांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. आधीची दोन वर्षे अध्यक्ष असलेल्या जी20च्या सदस्यदेशांनी मांडलेल्या मतांचा आदर केला जातो व त्यांचा प्रभावही असतो. त्यामुळे भारत आयोजित करीत असलेली ही जी20 परिषद संपली की भारताचा या संघटनेवरील प्रभाव ओसरला, असे होणार नाही. पुढच्या काळातही भारताच्या भूमिकेला महत्त्व असेल, असे सांगून जयशंकर यांनी या संघटनेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

तुर्कीमध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर, भारताने तुर्कीला प्रचंड प्रमाणात सहाय्य केले होते. केवळ तुर्कीच नाही तर पॅलेस्टाईनमध्येही भारताचे विकासकार्य सुरू आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. इतकेच नाही तर आत्ताच्या घडीला जगभरातील सुमारे 78 देशांमध्ये भारताचे विकासकार्य सुरू असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे हे सारे देश भारताकडे फार मोठे मन असलेला दिलदार देश म्हणून आदराने पाहत आहेत. याबरोबरच भारताची क्षमता अधिकाधिक वाढत चालल्याची जाणीव देखील या देशांना झालेली आहे. विकासाची दृष्टी व सक्षम नेतृत्त्व असलेला देश म्हणून भारताबद्दलचा जगभरातील आदर वाढत चालला आहे. सध्याच्या स्थितीत काही मोजके देशच सध्या जगाचा विचार करीत आहेत आणि अशा देशांमध्ये भारताचा समावेश आहे, असा दावा जयशंकर यांनी केला.

leave a reply