तेहरान – आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणची एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. पण युक्रेनमधील युद्धात इराणने केलेल्या सहाय्यानंतर येत्या वर्षभरात रशियन हवाई सुरक्षा यंत्रणा इराणमध्ये दाखल होऊ शकते. या व्यतिरिक्त इराण रशियाकडून सुखोई-35 अतिप्रगत विमाने देखील खरेदी करू शकतो. असे झाल्यास इस्रायलच्या लढाऊ विमानांना उत्तर देण्यासाठी इराणकडे तोडीस तोड उत्तर असेल, असा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत.
फोर्दो अणुप्रकल्पात 83.6 टक्के शुद्धतेचे युरेनियम संवर्धन करणारा इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचल्याची चिंता अमेरिका व युरोपिय देश व्यक्त करीत आहेत. इस्रायलच्या पंतप्रधानांनी देखील आपल्या देशाकडे स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचे सांगून इराणवर हल्ल्याचे संकेत दिले आहेत. पण युक्रेनच्या युद्धामुळे रशिया व इराणमधील लष्करी सहकार्य तीव्र झाले आहे. त्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ल्याची संधी निसटत चालल्याचा इशारा इस्रायलचे लष्करी देत आहेत.
अशा परिस्थितीत, गेल्या काही वर्षांपासून रखडलेला करार पूर्ण करण्यासाठी रशिया लवकरच इराणला एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी काही आठवड्यांपूर्वी केला होता. येत्या वर्षअखेरीपर्यंत रशियाचे एस-400 इराणमध्ये दाखल होईल, अशी शक्यताही वर्तविली जाते. तर इराणने रशियाकडून किमान 24 ‘सुखोई-35’ लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. येत्या वर्षअखेरीपर्यंत रशियन बनावटीची काही विमाने इराणमध्ये दाखल होईल, असा दावा केला जातो.
असे झाल्यास इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्यांसाठी रवाना होणाऱ्या इस्रायलच्या लढाऊ विमानांना एकाचवेळी एस-400 व सुखोई-35 विमानांचा सामना करावा लागू शकतो, याकडे इस्रायली विश्लेषक लक्ष वेधत आहेत. येत्या वर्षअखेरीपर्यंत एस-400 इराणमध्ये दाखल झाली तरी सदर यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी विलंब होऊ शकतो. त्यामुळे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना इराण भेदू शकणार नाही, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. पण अणुप्रकल्प किंवा लष्करी ठिकाणांवरील हल्ल्यांनंतर माघारी परतणाऱ्या इस्रायलच्या लढाऊ विमानांना इराणची सुखोई-35 विमाने लक्ष्य करू शकतात, असा इशारा इस्रायली विश्लेषक देत आहेत.