सिरियाच्या अलेप्पो विमानतळावर हवाई हल्ले

सिरियातील सरकारी वृत्तवाहिनीचा आरोप

syria aleppo airport_Pratyakshaदमास्कस – सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी हवाई हल्ले झाले. सिरियातील भूकंपग्रस्तांसाठी या विमानतळावरुन सहाय्य पुरविले जात होते. पण या हवाई हल्ल्यानंतर सिरियन सरकारला अलेप्पो विमानतळावरील पुढील काही दिवस विमानवाहतूकीसाठी बंद करावे लागले आहे. सिरियातील सरकारी वृत्तवाहिनीने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. पण इस्रायलने या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दरम्यान, अमेरिकन संरक्षणदलप्रमुखांच्या सिरिया भेटीनंतर हा हवाई हल्ला झाला आहे.

syria mapगेली काही वर्षे सिरियातील प्रवासी विमानतळ तसेच लष्करी ठिकाणे हवाई हल्ल्यांचे लक्ष्य ठरली आहेत. सिरियन सरकार किंवा काही वेळेस सरकारसंलग्न यंत्रणांनी यासाठी थेट इस्रायलवर आरोप केले होते. इस्रायलची लढाऊ विमाने सिरियाच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले चढवित असल्याचा ठपका सिरियाने ठेवला होता. इस्रायलने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण सिरियातील गृहयुद्धाच्या आडून हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांना शस्त्र तस्करी करण्याचे इराणचे प्रयत्न हाणून पाडणार. तसेच इराणचे छुपे लष्करी तळ व शस्त्रास्त्रांची कोठारे नष्ट करणार असल्याची घोषणा इस्रायलने केली होती.

सिरियाची राजधानी दमास्कस तसेच इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या सीमेजवळ सर्वाधिक हवाई हल्ले झाल्याचा दावा केला जातो. पण सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो तसेच पूर्वेकडील देर अल-झोर भागात फार कमी वेळा इस्रायलने हल्ले चढविल्याचे आरोप सिरियाने केले आहेत. अशा परिस्थितीत, मंगळवारी पहाटे अलेप्पो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार हवाई हल्ले झाले. या हल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सिरियन वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तसेच या हवाई हल्ल्यानंतर सिरियाने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती सिरियन वृत्तवाहिनीने दिली.

syria aleppo airport strike 2_Pratyakshaमंगळवारच्या हवाई हल्ल्यात अलेप्पो विमानतळाचे जबर नुकसान झाल्यामुळे पुढील काही दिवसांसाठी सदर विमानतळाची सेवा बंद करण्यात आल्याचे सिरियन सरकारने जाहीर केले. या विमानतळाचा वापर सिरियातील भूकंपग्रस्तांना सहाय्य पोहोचविण्यासाठी केला जात होता. महिन्याभरापूर्वी सिरियाला भूकंपाने हादरविले होते. या भूकंपग्रस्तांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून सहाय्य पोहोचविणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये इराणचाही समावेश होता. पण इराण या भूकंपाच्या बहाण्याने हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांना शस्त्रास्त्रे पुरवित असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.

इराणची ही शस्त्रतस्करी हाणून पाडण्यासाठी इराणच्या विमानांवर हल्ला चढविण्याचा इशाराही इस्रायलने दिला होता. अशा परिस्थितीत, मंगळवारी सकाळी अलेप्पो विमानतळावर झालेल्या हवाई हल्ल्यामागे इस्रायल असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते. इस्रायलने सिरियातील इराणच्या शस्त्रसाठ्याला लक्ष्य केल्याचा दावा केला जातो. पण सिरियन सरकारने अलेप्पोतील हल्ल्यात झालेल्या हानीची माहिती उघड करण्याचे टाळले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी सिरियाचा दौरा करुन येथील अमेरिकेच्या लष्करी तळाला आकस्मिक भेट दिली होती. सिरियामध्ये अजूनही अमेरिकेचे 900 जवान तैनात आहेत. या जवानांची तसेच या क्षेत्रातील अमेरिकेचे सहकारी देश व हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी हा सिरिया दौरा महत्त्वाचा असल्याचे मार्क मिले म्हणाले होते. त्याआधी अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी इस्रायलचा दौरा केला होता.

leave a reply