कैरो – जॉर्डन व इराकच्या दौऱ्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन बुधवारी इजिप्तमध्ये दाखल झाले. यावेळी संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेतली. अमेरिका व इजिप्तमधील संरक्षण सहकार्य या क्षेत्रासाठी आवश्यक असल्याचे ऑस्टिन यांनी म्हटले आहे. इजिप्तनंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलसाठी रवाना होणार असल्याचा दावा केला जातो.
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी इस्रायल व त्यानंतर सिरियाचा दौरा केला होता. याला चोवीस तासही उलटत नाही तोच अमेरिकेचे संरक्षणमंत्री आखाती देशांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यानंतर आखातातील घडामोडींचा वेग वाढल्याची बाब आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मित्रदेशांच्या दौऱ्यावर असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.
तर अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संरक्षणमंत्री ऑस्टिन यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरतो, असे अमेरिकी माध्यमे सांगत आहेत. पण आपल्या इराकच्या दौऱ्यात संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी इराकच्या पंतप्रधानांबरोबरच कुर्दवंशियांच्या नेत्यांचीही भेट घेतली. आयएस या दहशतवादी संघटनेविरोधी कारवाईसाठी अमेरिकेची इराकमधील तैनाती कायम राहणार असल्याची घोषणा ऑस्टिन यांनी केली. पण त्याचबरोबर इराकमधील कुर्द नेत्यांबरोबर इराणबाबत चर्चा केल्याच्या बातम्याही येत आहेत.
त्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री इजिप्तमध्ये दाखल झाले, हे देखील महत्त्वाचे ठरते. संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्यातील चर्चेचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. पण अमेरिका व इजिप्तमधील लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठी आपण या दौऱ्यावर असल्याचे ऑस्टिन यांनी सोशल मीडियावरुन सांगितले होते. पण इराणविरोधात आपल्या मित्रदेशांचे सहकार्य मिळविण्यासाठी ऑस्टिन यांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा केल्याचा दावा केला जातो. यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री बुधवारी रात्रीच इस्रायलसाठी रवाना होतील. वेस्ट बँकमध्ये संघर्ष भडकलेला असताना ऑस्टिन यांची ही इस्रायल भेट लक्षवेधी ठरत आहे.