वेस्ट बँकमधील इस्रायलच्या कारवाईत सहा दहशतवादी ठार

- गाझातून रॉकेट हल्ले

  • इस्रायलमध्ये हायअलर्ट जारी
  • अमेरिकेकडून इस्रायलचे समर्थन
  • अरब देशांची टीका

सहा दहशतवादी ठारजेरूसलेम/रामल्ला – इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले. दहा दिवसांपूर्वी ज्यूधर्मियांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या हमासच्या दहशतवाद्याचा यामध्ये समावेश होता, अशी माहिती इस्रायलने दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या कारवाईचे स्वागत केले. यानंतर पुढच्या काही तासातच गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दिशेने रॉकेट्सचा मारा केला, पण या हल्ल्यात इस्रायलचे नुकसान झालेले नाही. दरम्यान, इस्रायलने केलेली कारवाई स्वसंरक्षणासाठी असल्याचे सांगून अमेरिकेने इस्रायलचे समर्थन केले आहे. तर अरब लीगने व जॉर्डनने स्वतंत्रपणे इस्रायलवर जोरदार टीका केली आहे.

गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी वेस्ट बँकच्या हुवारा शहरात दोन ज्यूधर्मियांची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली होती. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगून इस्रायली सुरक्षा यंत्रणा गेले दहा दिवस दहशतवाद्याच्या शोधात होती. मंगळवारी अब्देल फताह हुसेन खारौशा हा दहशतवादी वेस्ट बँकच्या जेनिन शहरात सशस्त्र दहशतवाद्यांसोबत दडून असल्याची माहिती मिळाली. यावेळी इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरित्या कारवाई केली. यामध्ये खारौशाबरोबर सहा दहशतवादी देखील ठार झाले. हे दहशतवादी रुग्णवाहिकेचा वापर करून पळ काढण्याच्या प्रयत्नात होते, याचा व्हिडिओ इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केला.

सहा दहशतवादी ठारया कारवाईत ठार झालेल्यांमध्ये गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद तसेच वेस्ट बँकमधील अल-अक्सा मार्टिअर्स ब्रिगेड खारौशा या संघटनांचे दहशतवादी होते. इस्रायली सुरक्षा यंत्रणा खारौशाच्या अटकेसाठी जेनिनमध्ये दाखल होण्याच्या तयारीत असताना कट्टरपंथियांनी त्यांच्यावर दगडफेक केली. तसेच या जमावातून इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी इस्रायली जवानांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इस्रायली लष्कराला कारवाई करावी लागली. जमावामध्ये दडलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी इस्रायलने ड्रोन्स तसेच हेलिकॉप्टरचा देखील वापर केला. कट्टरपंथियांनी सदर ड्रोन्स उद्ध्वस्त केल्याची माहिती इस्रायली यंत्रणांनी दिली.

सहा दहशतवादी ठारजेनिनमधील या कारवाईच्या पुढच्या काही तासातच गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले झाले. यातील एकही रॉकेट इस्रायलच्या हद्दीत कोसळले नाही. तसेच इस्रायली लष्कराच्या पथकाजवळ बॉम्बस्फोट घडविल्याची घटनाही समोर आली आहे. रॉकेट हल्ले तसेच बॉम्बस्फोटात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे इस्रायली यंत्रणांनी स्पष्ट केले. पण इस्रायल सरकारने आपले लष्कर तसेच पोलीस यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. जेरूसलेममधील सुरक्षा तैनाती वाढविण्यात आली आहे. सध्या वेस्ट बँक तसेच गाझापट्टीच्या सीमेवर तणाव असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

वेस्ट बँकमधील पॅलेस्टाईनचे सरकार व फताह पक्षाने इस्रायली सुरक्षा यंत्रणेच्या या कारवाईवर टीका केली. तसेच अमेरिकेने हस्तक्षेप करून इस्रायलवर दबाव टाकावा, अशी मागणी केली. पण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने स्वसंरक्षणाचा अधिकार असलेल्या इस्रायलने केलेली कारवाई योग्यच असल्याचे म्हटले आहे. मात्र वेस्ट बँकमधील या कारवाईवर अरब देशांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी सरकारमध्ये संघर्षबंदी घडविणाऱ्या जॉर्डनने इस्रायलच्या कारवाईवर संताप व्यक्त केला. तर अरब लीगने इस्रायलच्या कारवाईचा निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून वेस्ट बँकमधून इस्रायलवर हल्ले सुरू झाले आहेत. नव्या दहशतवादी गटांचा या भागातील वाढता प्रभाव इस्रायलसाठी आव्हान ठरत असल्याचा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत.

leave a reply