इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शस्त्रास्त्रांची स्पर्धा पेटली आहे

भारताच्या नौदलप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – अमेरिका व चीन यांच्यातील इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सत्तास्पर्धा म्हणजे मॅरेथॉन असून ती इतक्यात संपणार नाही. मात्र या दोन महासत्तांमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शस्त्रास्त्रांची स्पर्धा पेट घेत आहे, असे सांगून भारताचे नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. या शस्त्रास्त्र स्पर्धेचा दाखला देताना नौदलप्रमुखांनी चीनने दशकभराच्या कालावधीत भारतीय नौदलाइतक्या युद्धनौका उभ्या केल्या आहेत, याकडे लक्ष वेधले. भविष्यातील ही आव्हाने लक्षात भारतीय संरक्षणदलांनी आपल्या पुनर्रचना आणि अद्ययावतीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती नौदलप्रमुखांनी दिली.

army-chied‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन-व्हीआयएफ’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना नौदलप्रमुखांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबत लक्षवेधी विधाने केली. ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र भू-राजकीय हालचालींचे केंद्र बनले आहे. या क्षेत्राच्या बाहेरील देश देखील इंडो-पॅसिफिकसाठी आपले डावपेच आखत आहेत. या क्षेत्रात अमेरिका व चीन यांची सत्तास्पर्धा सुरू झालेली आहे आणि ही स्पर्धा मॅरेथॉन अर्थात दिर्घकाळ चालणारी असेल, असा दावा नौदलप्रमुख आर. हरि कुमार यांनी केला. महासत्तांच्या या स्पर्धेमुळे शीतयुद्धाच्या आधीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा दावा नौदलप्रमुखांनी केला.

शीतयुद्धाच्या दरम्यान, अमेरिका व मित्रदेश आणि सोव्हिएत रशिया आणि सहकारी देशांचे गट एकमेकांसमोर खडे ठाकले होते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही अशाच प्रकारची मांडणी सुरू झाल्याचे संकेत याद्वारे नौदलप्रमुखांनी दिले. यामुळे या सागरी क्षेत्रात प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांची स्पर्धा पेट घेणार असल्याचे सांगून ॲडमिरल आर. हरि कुमार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी चीनचे उदाहरण दिले.

गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत चीनने आपल्या नौदलात १४८ युद्धनौका सामील केल्या. ही संख्या भारतीय नौदलातील एकूण युद्धनौकांइतकी आहे. इतक्यावरच चीन थांबलेला नाही, तर अजूनही चीन आपल्या नौदलाच्या ताफ्यात अधिकाधिक भर घालत आहे, असे नौदलप्रमुख म्हणाले. अशा शस्त्रस्पर्धेमुळे विविध प्रकारच्या स्त्रोतांनी समृद्ध असलेल्या आपल्या क्षेत्रातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, याची जाणीव नौदलप्रमुखांनी करून दिली. त्याचवेळी आत्ताच्या काळातील संघर्षांच्या बदलेल्या स्वरूपावरही नौदलप्रमुखांनी प्रकाश टाकला.

युक्रेनच्या युद्धानंतरही युरोपिय देश रशियाकडून अजूनही इंधनाची खरेदी करीत आहेत. याचाच अर्थ संघर्ष झाला तरी आजच्या काळात तुम्ही दुसऱ्या देशावरील आपले अवलंबित्त्व पूर्णपणे टाळू शकत नाही असा होते, याकडे नौदलप्रमुखांनी लक्ष वेधले. बदलत्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन भारतीय संरक्षणदलांनी भविष्यासाठी आपली पुनर्रचना आणि अद्ययावतीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे, असे नौदलप्रमुख पुढे म्हणाले.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, आपल्या ग्रेट निकोबार बेटसमुहांवर भारत लढाऊ विमाने व अवॅक्स विमाने तैनात करणार असल्याची बातमी आली आहे. या क्षेत्रातील भारतीय संरक्षणदलांची तैनाती पुढच्या काळात व्यूहरचनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे सामरिक विश्लेषकांनी याआधीच बजावले होते.

हिंदी English

leave a reply