व्हिएन्ना – गृहयुद्धात अडकलेल्या लिबियातून तब्बल अडीच टन वजनाचा युरेनियमचा साठा आश्चर्यकारकरित्या गायब झाला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांना कळविली आहे. एक टन युरेनियमच्या साठ्यातून अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक 5.6 किलो वजनाच्या साहित्याची निर्मिती करता येऊ शकते. त्यामुळे लिबियातील ही घडामोड अतिशय खळबळ उडविणारी ठरते.
लिबियामध्ये मोठ्या प्रमाणात युरेनियमचा साठा असल्याचे फार आधी उघड झाले होते. याचा वापर करून लिबिया अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो किंवा विघातक देशांना याची तस्करी करू शकतो, असा आरोप अमेरिका व पाश्चिमात्य मित्रदेशांनी केला होता. लिबियाकडे संवर्धित युरेनियम, सेंट्रिफ्यूजेस आणि अणुबॉम्ब निर्मितीचा आराखडा देखील होता. पण पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी 2003 साली लिबियाच्या राजवटीने अणुबॉम्ब निर्मितीपासून फारकत घेतली होती. 2011 साली नाटोच्या लष्कराने लिबियावर हल्ले चढवून कर्नल मुअम्मद गद्दाफी यांची राजवट उलथून लावली होती. त्यानंतर येथील युरेनियमच्या साठ्याची पाहणी अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांकडून नियमितपणे सुरू होती.
गेल्या वर्षी आयोगाचे निरिक्षक लिबियाला भेट देऊन 10 मोठ्या ड्रम्समध्ये साठविलेल्या युरेनियमचे निरिक्षण करणार होते. पण लिबियातील सरकार व बंडखोरांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे निरिक्षकांनी लिबियाचा दौरा टाळला होता. दोन दिवसांपूर्वी आयोगाच्या निरिक्षकांनी सदर ठिकाणाचे निरिक्षण केल्यानंतर अडीच टन युरेनियमचा साठा केलेले 10 ड्रम्स गायब असल्याचे उघड झाले. सरकार आणि बंडखोरांच्या संघर्षात अडकलेल्या लिबियातून युरेनियमचा एवढा प्रचंड साठा दिसेनासा झाल्यामुळे आयोगाच्या निरिक्षकांची घाबरगुंडी उडाली आहे.
हा साठा विघातक शक्तींच्या हातात सापडला तर युरेनियमच्या साठ्यातून अणुबॉम्बची निर्मिती करता येऊ शकते, अशी चिंता आयोगाला सतावित आहे. लिबियामधील बंडखोर गट देखील याचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा पैशांसाठी विघातक शक्तींना याची तस्करी करू शकतात, याकडे लष्करी विश्लेषक लक्ष वेधत आहेत. या पार्श्वभूमीवर, अणुऊर्जा आयोगाने लिबियातील घडामोडींची ही चिंताजनक माहिती माहिती सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांना दिली.