रशियाने सिरियातील तैनाती व तळ वाढवावे

सिरियन राष्ट्राध्यक्षांचा रशियाला प्रस्ताव

मॉस्को – ‘रशियाने सिरियातील आपल्या लष्करी तळ व सैन्यतैनाती वाढवावी. इतकेच नाही तर आवश्यक वाटत असल्यास रशियाने सिरियात कायमस्वरुपी तळ उभारावा’, असा प्रस्ताव सिरियन राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद यांनी दिला. त्याचबरोबर सिरियाचा युक्रेनच्या युद्धात रशियाला पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी केली. इस्रायल, अमेरिका व तुर्की हे देश दहशतवाद्यांवरील कारवाई करीत असल्याचे सांगून सिरियात सातत्याने हल्ले चढवित आहेत. अशा परिस्थितीत सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला हा प्र्रस्ताव देऊन आपल्या सुरक्षेची तरतूद करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

assad putinसिरियामध्ये रशियाचे एकूण दोन मोठे तळ आहे. यामध्ये सोव्हिएत रशियाच्या काळात येथील ‘तारतूस’ बंदरातील नौदल तळाचा समावेश आहे. तर गेल्या काही वर्षांपासून ‘हेमिम हवाईतळ’ सिरियातील रशियाचा दुसरा मोठा तळ ठरतो. या तळावर रशियाची लढाऊ विमाने तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा देखील तैनात आहे. तर तारतूस बंदरावर रशियन विनाशिका व युद्धनौकांचा ताफा तैनात आहे. हा नौदल तळ रशियासाठी भूमध्य समुद्रातील प्रभावासाठी सहाय्यक ठरत असल्याचा दावा केला जातो. याशिवाय सिरियाच्या इतरही भागात रशियन लष्कर तसेच लष्करी पोलिसांची तैनाती असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

पण सिरियातील वापरात असलेल्या लष्करी तळांव्यतिरिक्त रशियाने इतरही ठिकाणी नवे तळ उभारावे, तसेच सैन्यतैनाती वाढवावी. रशियाच्या या निर्णयाचे सिरिया स्वागतच करील, असे आवाहन रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबरील भेटीत केले. सिरियातील रशियाची ही तैनाती तात्पुरती असल्याचा दावा केला जात होता. पण पुतिन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर सिरियन राष्ट्राध्यक्षांनी रशियाला कायमस्वरुपी तळ उभारण्याचाही प्रस्ताव दिला. रशियन लष्कराची ही अतिरिक्त तैनाती सिरियासाठी सहाय्यकच ठरेल, असा विश्वासही अस्साद यांनी व्यक्त केला.

दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमधील या बैठकीत नव्या लष्करी तळांंवर चर्चा झाली नसल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. पण जानेवारी महिन्यातच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो प्रांतातील तळाचा उल्लेख केला होता. येथील अल-जराह हवाईतळाचा वापर करण्यासाठी रशिया उत्सुक असल्याची बातमी समोर आली होती. 2017 साली आयएसच्या दहशतवाद्यांकडून ताब्यात घेतलेला सदर हवाईतळ सध्या सिरियन लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे. तुर्कीच्या सीमेजवळ असलेल्या या तळाचा वापर सिरियातील हल्ले रोखण्यासाठी होईल, असा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने त्यावेळी केला होता. त्यामुळे येत्या काळात सिरियातील या तळावर रशियन विमानांची तैनाती दिसू शकते. नवे लष्करी तळ आणि अतिरिक्त सैन्यतैनातीबरोबरच सिरियन राष्ट्राध्यक्षांनी रशियाला नवा प्रस्ताव देखील दिला आहे. सिरियातील लष्करी तळांवर रशियाला आवश्यकता वाटत असेल तर त्यांनी अतिप्रगत क्षेपणास्त्रे, शस्त्रसाठा देखील तैनात करावा. अगदी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीलाही सिरियाचा विरोध नसल्याचे अस्साद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. युक्रेनच्या मुद्यावर बोलताना रशियन राष्ट्राध्यक्षांनी क्रिमिआ व इतर प्रांतांवरील रशियाचा ताबा ऐतिहासिकदृष्ट्या योग्यच असल्याचे अस्साद म्हणाले. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांसाठी तिसरे महायुद्ध छेडल्याचा आरोप अस्साद यांनी केला.

दरम्यान, 2011 साली सिरियामध्ये अस्साद राजवटीच्या विरोधात गृहयुद्ध भडकले होते. पाश्चिमात्य देशांचे समर्थन मिळालेल्या बंडखोर संघटना अस्साद यांची राजवट उलथविण्याचा प्रयत्न केला होता. आधी रशियाने केलेल्या लष्करी हस्तक्षेपामुळे पाश्चिमात्य देशांचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही. गेली 12 वर्षे रशियन लष्कर सिरियातील अस्साद राजवटीच्या पाठिशी ठामपणे उभे असून यामुळे अस्साद यांना आपली राजवट वाचविण्यात यश मिळाले आहे.

leave a reply