वॉशिंग्टन – ‘इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट उलथविण्याच्या आपल्या कारवाईचे अमेरिका 20 वर्षानंतरही समर्थन करीत आहे. याबाबत अमेरिकेला कुठलाही पश्चाताप नाही. याउलट अमेरिकेला जे योग्य वाटते, ते करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा संदेश अमेरिका जगाला देत आहे. त्यामुळे अमेरिकेला नाराज करणारा जगातील कुठलाही देश सुरक्षित राहू शकत नाही, असा संदेश अमेरिका देत आहे’, असा गंभीर आरोप अमेरिकेतील रशियन राजदूत अँटोली अँतोनोव्ह यांनी केला.
20 मार्च 2003 साली अमेरिकेने इराकमध्ये सैन्य घुसविले होते. इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन सर्वसंहारक शस्त्रांची निर्मिती करीत असल्याचा आरोप करुन अमेरिकेने इराकवर हल्ला चढविला होता. या घटनेला 20 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने बोलताना, हे इराक युद्ध अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात अंधारमय पान ठरते, अशी टीका रशियन राजदूत अँतोनोव्ह यांनी केली. संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय नियम याबाबत अमेरिकेला अजिबात आदर नाही. तसेच आपल्या कारवाया योग्य ठरविण्यासाठी उघडपणे लबाडी करून इराकच्या सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन करता येते, हे अमेरिकेने या इराक युद्धातून दाखवून दिले, याकडे अँतोनोव्ह यांनी लक्ष वेधले.
इराकच्या विरोधात युद्ध छेडण्यासाठी अमेरिकेने कायद्यांचे उल्लंघन केले, असा आरोप रशियन राजदूतांनी केला. या युद्धात लाखो जणांचा बळी गेला, लाखो विस्थापित झाले, ब्लॅकवॉटरसारख्या अमेरिकन कंत्राटी कंपन्यांनी हत्याकांड घडविले आणि अमेरिकन जवानांनी अबू घरेब तुरुंगात कैद्यांवर अत्याचार केल्याची आठवण रशियन राजदूतांनी करुन दिली.
इराकमधील अमेरिकन पद्धतीच्या लोकशाहीकरणाचे हे उदाहरण कधीही विसरता येणार नाही. कारण अमेरिकेच्या या कारवाईनेच इराकमध्ये ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटनेची निर्मिती झाली, असा ठपका अँतोनोव्ह यांनी ठेवला. पण 20 वर्षानंतरही अमेरिका इराकमधील आपल्या कारवाईचे समर्थनच करीत आहे. त्यामुळे अमेरिकेला नाराज करणारा कुठलाही देश सुरक्षित राहू शकत नाही, असा इशाराच अमेरिका देत असल्याचा आरोप रशियन राजदूतांनी केला.