सोमालियातील दुष्काळाने वर्षभरात 43 हजार जणांचा बळी घेतला

बळींमध्ये 21 हजार मुलांचा समावेश

droughtनैरोबी – गेल्या वर्षी सोमालियात आलेल्या दुष्काळामध्ये किमान 43 हजार जण दगावले. यात 21 हजार मुलांचा समावेश असल्याचा धक्ककादायक दावा नव्या आंतरराष्ट्रीय अहवालात करण्यात आला आहे. सोमालियातील दुष्काळाचे हे थैमान इतक्यावरच थांबणार नाही. तर 2023 सालच्या पहिल्या सहा महिन्यातच दुष्काळाने सोमालियातील 18 हजार जणांचा बळी जाईल, असा हादरविणारा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. युक्रेनच्या युद्धामुळे सोमालियाकडे पाठ फिरविणाऱ्या पाश्चिमात्य देशांमुळे या संकटाची दाहकता वाढल्याची टीका सोमालियाच्या वरिष्ठ अधिऱ्यांनी केली होती.

‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून संबोधिले जाणाऱ्या सोमालिया, इथिओपिया आणि केनिया या देशांमध्ये सलग सहाव्या वर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे या आफ्रिकी देशांना सलग सहाव्या वर्षी सुका दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे इतर देशांप्रमाणे या आफ्रिकी देशांमध्ये महागाई आणि अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. यापैकी सोमालियातील परिस्थिती अतिशय आव्हानात्मक बनल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघ तसेच लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ॉपिकल मेडिसीन या तीन संघटनांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. सोमालियावरील संकट इतक्यात संपणारे नसल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

somalia crisis2022 साली सोमालियातील दुष्काळात किमान 43 हजार जणांचा बळी गेल्याची माहिती या संघटनांनी दिली. पहिल्यांदाच अधिकृत स्तरावर आंतरराष्ट्रीय संघटनांनी सोमालियातील दुष्काळातील बळींची माहिती उघड केली. सध्या सोमालियामध्ये 60 लाख जण उपासमारीला सामोरे जात असल्याचेही यात म्हटले आहे.

2011 साली सोमालियावर कोसळलेल्या दुष्काळाच्या संकटाहूनही अधिक भयानक संकट या देशावर कोसळणार असल्याचे या विश्लेषक बजावत आहेत. दशकभरापूर्वीच्या दुष्काळात सोमालियातील दोन लाख, 60 हजार जणांचा बळी गेला होता. येत्या काळात सोमालियात याहून भीषण आपत्ती येणार असल्याचा दावा हे विश्लेषक करीत आहेत. सध्याच्या संकटात सोमालियातील लाखो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. दुष्काळामुळे आलेले हे संकट थैमान घालत असतानाच, अल-शबाब व इतर दहशतवादी संघटनांमुळे सोमालियात 38 लाख जण विस्थापित झाले आहेत, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

अशा दारूण परिस्थितीतही सोमालियाला आंतरराष्ट्रीय स्तरातून आवश्यक सहाय्य मिळत नसल्याची तक्रार संयुक्त राष्ट्रसंघातील सोमालियाचे समन्वयक ॲडम अब्देलमौला यांनी केली. युक्रेनच्या युद्धाचे कारण देऊन पाश्चिमात्य देशांनी सोमालियाकडे पाठ फिरविली, असा गंभीर आरोप अब्देलमौला यांनी केला होता. याआधीही आफ्रिकन देशांमधील दुष्काळ व असुरक्षेकडे पाश्चिमात्य देश दुर्लक्ष करीत असल्याची बाब उघड झाली होती. आफ्रिका खंडातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्याच्या पलिकडे जाऊन आफ्रिकन देशांना अन्न पाणी व उपचारांसारख्या मुलभूत सुविधा पुरविण्यासही पाश्चिमात्य देश तयार नसल्याचे यामुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

leave a reply