रशियाच्या प्रसिद्ध लष्करी ब्लॉगरची बॉम्बस्फोटात हत्या

सेंट पीट्सबर्ग – रशियाचा प्रखर समर्थक आणि युक्रेनच्या लष्करी अपप्रचाराला छेद देणारा प्रसिद्ध ब्लॉगर ‘मक्सिम फोमिन’ ऊर्फ ‘व्लाद्लेन तातारस्की’ याची एका कॅफेमधील स्फोटात हत्या करण्यात आली. यामध्ये 19 जण जखमी झाले आहेत. तातारस्की याला दिलेल्या भेटवस्तूमध्ये बसविलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याचा संशय रशियन यंत्रणा वर्तवित आहेत. याप्रकरणी रशियन सरकारविरोधी ‘दर्या ट्रेपोव्हा’ हिला ताब्यात घेण्यात आले आहे.

रशियाच्या प्रसिद्ध लष्करी ब्लॉगरची बॉम्बस्फोटात हत्यारशियाच्या सेंट पीट्सबर्ग शहरातील कॅफेमध्ये तातारस्की एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला छोटा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात या पुतळ्याचा स्फोट झाला व यामध्ये तातारस्की जागीच ठार झाला. रशियन लष्करासाठी ब्लॉगिंग करण्याआधी तातारस्की 2014 साली क्रिमिआच्या संघर्षात रशियासमर्थक बंडखोर गटाचा सदस्य होता. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यापासून तातारस्की आपल्या ब्लॉगिंगने रशियाविरोधी प्रचाराचा समाचार घेत होता. त्यामुळे तो रशियाविरोधी गटाच्या निशाण्यावर होता, असा दावा केला जातो.

दरम्यान, तातारस्कीला लक्ष्य करून रशियाविरोधी गटाने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना इशारा दिल्याचा दावा केला जातो. काही आठवड्यांपूर्वी पुतिन यांच्या निकटवर्तीयांची देखील हत्या घडविण्यात आली होती.

leave a reply