इटलीकडून ‘चॅटजीपीटी’ या प्रगत चॅटबोटवर बंदीचा निर्णय

– पाश्चिमात्य देशांमधील पहिलाच देश

रोम – इटलीने आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून विकसित करण्यात आलेल्या ‘चॅटजीपीटी’ या प्रगत चॅटबोटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सदर चॅटबोट माहितीची सुरक्षा व खाजगी अधिकारांच्या हक्कावर अतिक्रमण करणारा आहे, असा खुलासा इटलीच्या ‘डाटा प्रोटेक्शन ऑथॉरिटी’ने केला आहे. बंदीचा निर्णय घेताच सदर चॅटबोट विकसित करणाऱ्या ‘ओपन एआय’ या कंपनीची तत्काळ चौकशीही सुरू करण्यात येईल, असे इटली सरकारने जाहीर केले.

CHAT-GPTगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘ओपन एआय’ या कंपनीने ‘चॅटजीपीटी’ हा प्रगत चॅटबोट सादर केला होता. विविध क्षेत्रातील प्रश्नांवर या चॅटबोटने दिलेली उत्तरे व इतर प्रतिसादामुळे ‘चॅटजीपीटी’ चर्चेचे केंद्र बनला होता. सध्याच्या घडीला जगभरात विविध क्षेत्रातील कोट्यावधी लोकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी या चॅटबोटचा वापर करण्यात येतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी मायक्रोसॉफ्टने ‘ओपन एआय’मध्ये गुंतवणूक केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या ‘बिंग’ या सर्च इंजिनमध्येही ‘चॅटजीपीटी’चा वापर करण्यात आला आहे.

मात्र जगभरात वेगाने लोकप्रिय झालेल्या ‘चॅटजीपीटी’संदर्भातील अनेक समस्याही समोर येण्यास सुरुवात झाली आहे. काही देश व मुद्यांच्या बाबतीत या चॅटबोटचा प्रतिसाद पूर्वग्रहदूषित व चुकीचा असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी त्याकडे व्यक्तीच्या खाजगी माहितीच्या सुरक्षेबाबत तसेच लहान मुलांना देण्यात येणाऱ्या संवेदनशील प्रतिसादाबाबत स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. याच मुद्यावरून इटलीने ‘चॅटजीपीटी’वर बंदी घालून ‘ओपन एआय’ची चौकशी सुरू केली आहे. इटलीव्यतिरिक्त चीन, रशिया, इराण व उत्तर कोरिया या देशांनी ‘चॅटजीपीटी’वर बंदी घातली आहे.

हिंदी

leave a reply