मॉस्को/वॉशिंग्टन – रशियाने जिंकलेला युक्रेनचा भूभाग पुन्हा युक्रेनला मिळवून देणे, हे युक्रेनच्या मित्रदेशांचे पहिले ध्येय आहे. त्यानंतर युक्रेनला मध्यम व दिर्घ पल्ल्यापर्यंत मारा करू शकणारी शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देणे, ही मित्रदेशांची दुसरी प्राथमिकता असेल. यामुळे पुढच्या काळात रशिया युक्रेनवर हल्ला चढविणार नाही, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला. त्याचवेळी रशिया व युक्रेनमध्ये वाटाघाटींची शक्यता अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळली. हा प्रस्ताव कितीही आकर्षक असला तरी रशियाने युक्रेनचा भूभाग परत केल्याखेरीज या प्रस्तावाला काहीच अर्थ नसेल, असे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. येत्या काही आठवड्यात युक्रेन रशियावर प्रतिहल्ले सुरू करील, असे सूचक विधान देखील अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे.
बाखमत तसेच इतर आघाड्यांवर रशियन सैन्याने युक्रेनी लष्कराची दैना उडविली असून रशियाने हा महत्त्वाचा प्रांत ताब्यात घेतल्याचे दावे केले जातात. तर युक्रेन मात्र आपले जवान अजूनही रशियाचा प्रतिकार करीत असल्याचे म्हटले आहे. पण बाखमत रशियाच्या हाती पडेल, अशी चिंता आता युरोपिय देश देखील व्यक्त करू लागले आहेत. युक्रेनच्या युद्धात अशारितीने आपली सरशी होत असताना, रशियाने युक्रेनचे युद्ध रोखून संघर्षबंदीसाठी वाटाघाटींचा प्रस्ताव दिला. मात्र या वाटाघाटी रशियाचे हितसंबंध आणि रशियाच्या चिंता लक्षात घेऊन व्हाव्या, अशी अपेक्षा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केली.
मात्र रशियाकडून असा प्रस्ताव येत असताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मात्र रशियाला धडा शिकविण्याची भाषा करीत आहेत. 2014 सालच्या युद्धात रशियाने युक्रेनकडून क्रिमिआ प्रांत जिंकून घेतला होता. हा प्रांत आता रशियन संघराज्याचा भाग बनला आहे. पण युक्रेन क्रिमिआ परत मिळविल्यावाचून राहणार नाही, असा दावा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला. आपल्या हातून बाखमत सारखा युक्रेनचा प्रांत निसटत असताना, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेली ही विधाने विपर्यास्त ठरतात. मात्र येत्या काही आठवड्यात युक्रेन रशियन सैन्यावर प्रतिहल्ले चढविणार असल्याचा दावा करून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यांना पाठबळ दिल्याचे दिसत आहे.
रशियाने दिलेले वाटाघाटींचे प्रस्ताव आकर्ष असले तरी, युक्रेनचे ताब्यात असलेले भूभाग रशियाकडेच राहणार असतील, तर या प्रस्तावांना काहीच अर्थ उरत नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे. ‘युक्रेनच्या मित्रदेशांसमोर दोन प्रमुख ध्येय आहेत. यामध्ये रशियाने जिंकलेला भूभाग युक्रेनला परत मिळवून देणे व युक्रेनला मध्यम व दिर्घ पल्ल्यापर्यंत मारा करू शकणारी शस्त्रास्त्रे पुरविणे, यांचा समावेश असल्याचे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या विधानांची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे, असे सांगून रशियाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले. अमेरिकेचे हे दावे लक्षात घेऊन रशिया त्यानुसार पुढची पावले उचलणार असल्याचा दावा पेस्कोव्ह यांनी केला आहे.
हिंदी