फिनलँडपाठोपाठ स्वीडन देखील लवकरच नाटोमध्ये सहभागी होणार

ब्रुसेल्स – फिनलँड नाटोमध्ये सहभागी झाल्यानंतर या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जगभराचे लक्ष वेधून घेणारे विधान केले होते. स्वीडनच्या नाटोमध्ये सामील झाल्याखेरीज फिनलँडचा नाटोमधील सहभाग अधुरा असेल, असा दावा राष्ट्राध्यक्ष सोली निनित्सो यांनी केला होता. त्यानंतर युरोपियन माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी देखील लवकरच स्वीडन देखील नाटोमध्ये सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.

फिनलँडपाठोपाठ स्वीडन देखील लवकरच नाटोमध्ये सहभागी होणारआपल्या शेजारी देशांमध्ये नाटोला शिरकाव करण्याची संधी न देण्याचे धोरण रशियाने स्वीकारले होते. रशियाच्या शेजारी देशांना नाटोत सहभागी करून या देशांमध्ये रशियाच्या विरोधात क्षेपणास्त्रे व अण्वस्त्रेही तैनात करण्याचा नाटोचा डाव आहे. याद्वारे रशियाच्या सुरक्षेला थेट आव्हान देण्याची तयार नाटोने केल्याचे आरोप रशियाने वारंवार केले होते. नाटोत सहभागी होण्याची तयारी केली म्हणूनच रशियाने युक्रेनवर गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हल्ला चढविला होता. अशा परिस्थितीत फिनलँड व स्वीडनला आपल्या लष्करी संघटनेत सहभागी करण्याच्या हालचाली सुरू करून नाटोने रशियावर कुरघोडी करण्यासाठी डावपेच आखले होते.

फिनलँड नाटोमध्ये सहभागी झाल्यानंतर रशियाने याच्या गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. यानंतर रशियाने बेलारूसमध्ये आपली इस्कंदर क्षेपणास्त्रे तैनात केली होती. याला काही दिवस उलटत नाहीत तोच स्वीडन देखील नाटोमध्ये सहभागी होणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तुर्की व हंगेरी या नाटोच्या सदस्यदेशानी अद्याप स्वीडनच्या प्रवेशाला मान्यता दिलेली नाही. पण लवकरच ही प्रक्रिया देखील पूर्ण होईल आणि स्वीडन नाटोचा सदस्य बनेल, असा दावा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे.

फिनलँडपाठोपाठ स्वीडन देखील लवकरच नाटोमध्ये सहभागी होणारफिनलँडनंतर स्वीडनचा नाटोतील सहभाग अपेक्षित मानला जात होता. त्यामुळे रशियाने याविरोधात आधीपासूनच हालचाली सुरू केल्या असून स्वीडन नाटोचा सदस्य बनल्यानंतर, रशिया त्वरित याबाबतचे निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. रशियाच्या नेत्यांनी याची पूर्वसूचना दिलेली आहे. युक्रेनच्या युद्धाची तीव्रता वाढत असताना, युरोपातील नाटोचा हा विस्तार इथले वातावरण अधिकच ज्वालाग्रही बनवित आहे.

मात्र या परिस्थितीला दुसरे कुणीही नाही, तर रशियाच जबाबदार असल्याचे दावे फिनलँड आणि स्वीडनचे नेते करीत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेणे भाग पडल्याचे दावे या दोन्ही देशांकडून केले जातात. तर नाटोत सहभागी होऊन फिनलँड व स्वीडन सुरक्षित नाही, तर अधिक असुरक्षित बनले आहेत, असा इशारा रशियाने दिला होता. पुढच्या काळात या देशांना त्याची जाणीव होईल, असे रशियाने बजावले आहे. त्याचवेळी रशियाला घेरण्यासाठी नाटोने फार आधीच आखलेल्या कारस्थानाद्वारे हे सारे घडविले जात असल्याचे रशिया सातत्याने सांगत आहे.

हिंदी

 

leave a reply