जागतिक मंदीच्या भीतीने आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण

south korea choo kyungन्यूयॉर्क/लंडन – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह जगातील काही आघाडीच्या बँकांनी महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढविण्याचे धोरण पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून गुंतवणुकदारांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेचे पडसाद आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये उमटले. सोमवारी जगभरातील प्रमुख शेअरबाजारांमध्ये अर्ध्या टक्क्यापासून दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली. या घसरणीमुळे जगातील प्रमुख कंपन्यांसह सामान्य गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसल्याचे सांगण्यात येते.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ केली होती. त्यावेळी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी पुढील वर्षातही दरवाढ कायम राहिल असे बजावले होते. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेनेही व्याजदरात वाढ केली आहे. युरोप तसेच आशियातील अनेक बँकांनी याची पुनरावृत्ती करण्याचे संकेत दिले आहेत. या दरवाढीमुळे कर्जे महागणार असून ग्राहकांची क्रयशक्ती घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरे, गाड्या व इतर उत्पादनांच्या मागणीला मोठा फटका बसू शकतो. या सर्वांचा परिणाम व्यापारावर होऊन आर्थिक मंदीला प्रोत्साहन मिळेल, असे मानले जाते.

recessionजगभरातील आघाडीच्या वित्तसंस्थांनी 2022ची अखेरची तिमाही व 2023 सालात मंदीची शक्यता असल्याचे भाकित आधीच वर्तविले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये अस्वस्थता असून त्यांनी शेअरबाजारातील पैसा काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका जगातील सर्वच आघाडीच्या शेअरबाजारांना बसला. सोमवारी अमेरिका, युरोप व आशियातील सर्व शेअरनिर्देशांकांमध्ये अर्ध्या ते दोन टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली.

अमेरिकेतील ‘नॅस्डॅक’, ‘डो जोन्स’ व ‘एसॲण्डपी 500’ हे निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक खाली आले. तर युरोपमधील ‘डॅक्स’, ‘सीएसी 40’, ‘रसेल 2000’ या निर्देशांकांमध्ये अर्ध्या ते एक टक्क्याची घसरण झाली. आशियातील ‘निक्केई 225’, ‘हँग सेंग’, ‘शांघाय कंपोझिट’, ‘शेन्झेन’, ‘कॉस्पि’ या शेअरबाजारांमध्ये दीड ते दोन टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे निर्देशांकही काही प्रमाणात खाली आल्याचे सांगण्यात येते.

global stocksगेले काही महिने शेअरबाजारांमध्ये सातत्याने घसरण सुरू असून अमेरिका, युरोप तसेच चीनमधील काही निर्देशांक वर्षातील नीचांकी पातळीवर आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या आर्थिक निकालांमध्ये घसरणीचे संकेत दिले असून आर्थिक बाजू सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यात शेअरबाजारात सक्रिय असणाऱ्या ‘गोल्डमन सॅक्स’सारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या चीनसारख्या देशांमधील आपली गुंतवणूक कमी करीत असून त्याचाही परिणाम शेअरबाजारावर दिसून येत आहे.

दरम्यान, आशियातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या दक्षिण कोरियाने पुढील वर्षात मंदीचे संकेत दिले आहेत. जागतिक स्तरावरील घसरणीमुळे 2023 साली देशाची अर्थव्यवस्था दोन टक्क्यांपेक्षा कमी विकास दर नोंदविल, असे दक्षिण कोरियाचे अर्थमंत्री चू क्युंग-हो यांनी बजावले. दक्षिण कोरियाच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या अहवालात पुढील वर्षी देशाची अर्थव्यवस्था 1.7 टक्के दर गाठेल, असे म्हटले आहे.

हिंदी

leave a reply