इराणबरोबर अजूनही अणुकरार शक्य आहे

-फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन

macron-raisiपॅरिस/तेहरान – ‘व्हिएन्ना येथील वाटाघाटीतून अणुकरार शक्य झाला नाही, हे खरोखरच निराशाजनक आहे. पण 2015 सालचा अणुकरार आजही पुनर्जिवित करता येऊ शकतो. पण लवकरात लवकर हा करार करावा लागेल’, असा विश्वास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला अणुकरारावरील चर्चेसाठी नव्याने आमंत्रित केले. दरम्यान, अणुकराराबाबतच्या वाटाघाटी पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुप्रकल्पात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरा बंदच राहतील, अशी घोषणा इराणने केली आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यात जवळपास दोन तास फोनवरुन चर्चा झाली. इराणचा अणुकार्यक्रम तसेच इराणमध्ये कैद असलेल्या फ्रेंच नागरिकांच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि रईसी यांच्यात चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो. मार्च महिन्यापासून अणुकराराबाबतच्या रखडलेल्या वाटाघाटींवर मॅक्रॉन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच 2015 सालचा अणुकरार अजूनही संपुष्टात आलेला नाही, याची जाणीव फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी करून दिली.

iran-nuclearइराणने 2015 सालच्या अणुकरारात पुन्हा सहभागी व्हावे आणि यातील शर्तींचे पालन करावे, असे आवाहन मॅक्रॉन यांनी केले. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अपयशी ठरल्या असल्या तरी अणुकरार सुरू ठेवात येऊ शकतो, असा दावा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केला. यासाठी अधिक वेळ वाया दवडण्याची आवश्यकता नसून इराणने लवकरात लवकर अणुकरार पुनर्जिवित करावा, असे आवाहन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केले. पण त्याआधी इराणने अणुकराराबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही मॅक्रॉन यांनी ठासून सांगितले.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या या आवाहनावर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी इराण वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पण या अणुकराराबाबत इराणच्या असलेल्या मागण्या मान्य झाल्या आणि इतर देशांनी हा करार टिकविण्याची हमी दिली तरच व्यवहार्य करार शक्य होऊ शकतो, असे रईसी म्हणाले. त्याचबरोबर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांसाठी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी बायडेन प्रशासनावर ताशेरे ओढले.

अमेरिकेने लादलेले निर्बंध इराणसाठी नव्हे तर युरोपसह जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरतील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी दिला. अमेरिकेच्या निर्बंधानंतरही इराणच्या आर्थिक समिकरणात फरक पडलेला नसल्याचा दावा रईसी यांनी केला. तसेच या अणुकराराचे भविष्य इराणवर नाही तर अमेरिकेवर अवलंबून असल्याचे रईसी यांनी बजावले.

दरम्यान, 2015 सालच्या अणुकरारानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुप्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरा बसविले होते. इराणच्या अणुप्रकल्पातील हालचालींवर नजर ठेवण्याचे काम या सीसीटीव्हीतून केले जात होते. पण चार महिन्यांपूर्वी इराणने सीसीटीव्ही कॅमेरा काढून आंतरराष्ट्रीय समुदायावर टीका केली होती. पण आता इराणने पुन्हा सदर कॅमेरा कार्यान्वित करण्याची तयारी दाखविली आहे. पण त्याआधी अणुकराराबाबतच्या वाटाघाटी सुरू करणे आवश्यक असल्याचे रईसी म्हणाले.

leave a reply