देशात चोवीस तासात सुमारे २०० नवे रुग्ण

नवी दिल्ली, दि. २८ (वृत्तसंस्था) –  देशात गेल्या चोवीस तासात ‘कोरोनाव्हायरस’ ची  लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ९५० पर्यंत पोहोचली आहे.  चोवीस तासात सुमारे २०० नवे रुग्ण आढळले  आहेत. पुढच्या काळात देशातील रुग्णांची संख्या वाढू शकेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून तयारी केली जात आहे. पंतप्रधानांनी  जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले असून  या निधीचा वापर  अशा प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी होईल, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी देशभरात लॉकडाऊन घोषित केलेल्याला  चार दिवस उलटले आहेत. मात्र  लॉकडाऊनचे गांभीर्य अजूनही काही नागरिकांना पटलेले दिसत नाही. घरी राहण्याचे व केवळ अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांना न जुमानता काही नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई सुरु असल्याचे  पाहायला मिळते.
तसेच रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात राहत असलेले कामगार पुन्हा आपापल्या राज्यात परतत असल्याने काही राज्यांच्या सीमेवर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. राज्यांच्या सीमा बंद असल्याने, तसेच प्रवासाची साधने नसल्याने चालत आपल्या घराकडे निघालेले हजारो मजूर व त्यांचे कुटुंबिय अडकून पडले आहेत. दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांबरोबर महारष्ट्रामध्येही काही प्रमाणात ही  समस्या दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना जेथे आहेत तेथेच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या स्थलांतरित मजुरांना साहाय्य करण्यासाठी सरकार, सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत.
या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुढील काही दिवस संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात येत आहे.  केंद्र सरकारने राज्य सरकारच्या  मदतीने ज्या भागात  करोनाचे अधिक रुग्ण आहेत त्या भागांकडे अधिक  लक्ष केंद्रीत केल्याची माहिती  आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. प्रत्येक राज्यात या साथीच्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष रुग्णालये उभारण्यात आली आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या तीन दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. गुरुवारी ८० नवे रुग्ण आढळले होते, तर शुक्रवारी सुमारे १०० नवे रुग्ण आढळले. शनिवारी चोवीस तासात २०० नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारी महाराष्ट्रात  २८ नवे रुग्ण सापडले . त्यामुळे महाराष्ट्रातील या साथीच्या रुग्णांची संख्या १८१ वर पोहोचली आहे. मुंबईत या साथचे २२ नवे रुग्ण सापडले. नागपुरात दोन,  पालघर, वसई आणि नवी मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. मुंबईत आतापर्यंत ‘कोरोनाव्हायरसच्या  ७३ रुग्णांची नोंद झाली आहे.
           दरम्यान देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन  पंतप्रधांनी केले आहे. यानंतर  पीएम-केअर्स फंडात निधी येण्यास सुरुवात झाली आहे. टाटा ग्रुप कडून एकूण १५०० कोटी रुपयांचे योगदान  पीएम-केअर्स फंडात देण्यात आले.

leave a reply