सिंधु जलवाटप करारानुसारच पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी वळवून सिंचनासाठी वापरण्याची योजना

- जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची माहिती

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली झालेल्या सिंधु जलवाटप कराराअंतर्गतच पाकिस्तानात वाहून जाणारे जास्तीचे पाणी सिंचनासाठी वळविण्यात येत असल्याचे, जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी म्हटले आहे. भारताच्या वाट्याचे पाणी पाकिस्तानात वाहून जाऊ न देता त्याचा पूर्ण वापर भारताच कसा करता येईल, याकडे लक्ष पुरविण्यात येत आहे आणि त्यादृष्टीने विविध योजनांवर काम सुरू असल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे.

सिंधु जलवाटप करारानुसारच पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी वळवून सिंचनासाठी वापरण्याची योजना - जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची माहितीभारत सध्या भारतातून वाहत पाकिस्तानात जाणार्‍या बियास, रावी, सतलज सारख्या नद्यांवर विविध प्रकल्पांवर काम करीत आहे. यामध्ये लहान मोठे जलविद्युत प्रकल्प असून काही सिंचन प्रकल्प आहेत. रावी नदीची मुख्य सहाय्यक नदी असलेल्या उज्ह नदीवर एक प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे सुमारे 781 एमसीएम पाणी साठवता येणार आहे. उज्ह नदीचे पाणी वळवून या साठवणूक प्रकल्पात आणले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना भारतात सतलज, रावी व इतर नद्यांवर उभारण्यात येत असलेले प्रकल्प हे भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधूजल वाटप कराराला धरूनच आहेत, असे शेखावत यांनी स्पष्ट केले.

1960 साली नऊ वर्षांच्या वाटाघाटीनंतर वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानमध्ये सिंधू जलवाटप करार झाला होता. या कराराचे पालन भारत करीत आहे व या कराराच्या चौकटीत राहून सर्व प्रकल्प राबविले जात असल्याचे शेखावत म्हणाले. भारताच्या वाट्याचे जे पाणी पाकिस्तानात वाहून जात आहे, त्याचा पुरेपुर वापर करण्यासाठी हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी अडवून, ते भारतीय भूमीतच सिंचनासाठी वळविण्यात येत आहे. याच पाण्याचा वापर लाखो हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी होईल. यादृष्टीनेच योजनाबद्धरित्या प्रकल्प तयार केले जात आहेत, असे शेखावत म्हणाले.

सिंधु जलवाटप करारानुसारच पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी वळवून सिंचनासाठी वापरण्याची योजना - जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची माहितीसिंधू जलवाटप कराराअंतर्गत भारताच्या वाट्याला रावी, सतलज, बियास नदीचे पाणी आले, तर पाकिस्तानला झेलम, चिनाब, व सिंधुचे पाणी मिळाले. त्यामुळे रावी, सतलज, बियास आणि त्यांच्या पुरक नद्यांवर उभारण्यात येत असलेले प्रकल्प हा आपला हक्क आहे. त्यामुळे त्यावर उभे राहत असलेल प्रकल्प कोणत्याही दृष्टीने गैर ठरत नसून यावर पाकिस्तान प्रश्‍न उपस्थित करू शकत नाही. मात्र असे असले तरी पाकिस्तान या प्रकल्पांवर आक्षेप घेतो. पण ते पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे, शेखावत यांनी बजावले.

2016 साली उरी येथे भारतीय लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतरच भारताने पाकिस्तानात वाहून जात असलेल्या भारतीय वाट्याच्या पाण्याला रोखण्याचा संकल्प जाहीर केला होता. तसेच वेळ आली तर भारत इतर नद्यांचे पाणी रोखण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. रक्त आणि पाणी एकसाथ वाहू शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान मोदी यांनी बजावले होते. तर भारताच्या वाट्याचा एक थेंबही पाकिस्तानात वाहून जाऊ दिला जाणार नाही, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतात उभारण्यात येत असल्या प्रकल्पावरून पाकिस्तान खूपच अस्वस्थ असून भारताने पाणी तोडले, तर पाकिस्तान वैराण वाळवंट होईल, अशी भिती पाकिस्तानला सतत सतावत आहे.

leave a reply