काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराची अतिरिक्त तैनाती

नवी दिल्ली – पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ लष्कराची ब्रिगेड अर्थात ३,००० सैनिक तैनात केले आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूद नरवणे यांच्या जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौर्‍यानंतर ताबडतोब ही तैनाती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने भारताच्या सीमेवर गोळीबार सुरू केला असून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात संघर्षबंदीचे उल्लंघन सुरू आहे. भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानी लष्कराला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. लडाखच्या सीमेवर भारत-चीन तणाव वाढलेला असताना मित्रदेश असलेल्या चीनला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आगळीक करू शकते, हे लक्षात घेऊन भारतीय लष्कराने ही अतिरिक्त तैनाती केल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवरील हल्ले वाढविले आहेत. १ मार्च ते ७ सप्टेंबर या काळात तब्बल २,४५३ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिली. तर या महिन्यातच पाकिस्तानी लष्कराने ३१ वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय पाकिस्तानी जवानांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर १९२ वेळा गोळीबार केल्याचेही नाईक यांनी सांगितले. नियंत्रण रेषेजवळील पुंछ, राजौरी, गुरेज, बालाकोट या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराकडून मॉर्टर्स, रॉकेट्सचे हल्ले तसेच गोळीबार सुरू आहे. या हल्ल्यांच्या आडून पाकिस्तानचे लष्कर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला जातो. पुढच्या दोन महिन्यात, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानकडून या संघर्षबंदीच्या आडून घुसखोरीचे जोरदार प्रयत्न केले जातील, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणार्‍या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले असून गेल्या काही दिवसांमधे हिजबुल मुजाहिद्दीन, अल-बद्र या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांची कंबर मोडली आहे. या संघटनांच्या दहशतवाद्यांना संपविण्याबरोबर भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या सहाय्याने या दहशतवादी संघटनांच्या हस्तकांनाही ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी पाकिस्तानने ड्रोन्सचा वापर सुरू केला असून शुक्रवारी रात्री राजौरीमध्ये सैन्याने केलेल्या कारवाईत ड्रोनमधून रवाना केलेले २ एके रायफल्स, ६ मॅग्झीन्स, २ चिनी बनावटीच्या पिस्तूल-मॅग्झीन्स, ४ ग्रेनेड्स ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी कथूआ आणि जवाहर भागातून असे चार ड्रोन्स हस्तगत करण्यात आल्या होत्या.

पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी गुरुवारी-शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा दौरा केला. पाकिस्तानी लष्कराकडून संघर्षबंदीचे होत असलेले उल्लंघन आणि लष्कराच्या तयारीचा आढावा लष्करप्रमुखांनी यावेळी घेतला. पाकिस्तानी लष्कर तसेच दहशतवाद्यांना जोरदार उत्तर देणार्‍या भारतीय सैनिकांचे लष्करप्रमुखांनी कौतूक केले. तसेच सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैन्याकडून प्रगत टेहळणी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती लष्करप्रमुखांनी दिली. यानंतर शनिवारी पाकिस्तान जवळच्या नियंत्रण रेषेजवळ ३,००० सैनिक तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.

लडाखच्या सीमेवर भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेऊन पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरवर चाल करावी, असा सल्ला पाकिस्तानातील युद्धखोर विश्लेषक देत आहेत. तसेच पाकिस्तानचे सहाय्य घेऊन चीन भारताला दोन आघाड्यांवर युद्ध लढण्यास भाग पाडू शकतो, अशा धमक्या चीनचे सरकारी मुखपत्र देत आहे. मात्र, भारत एकाचवेळी दोन आघाड्यांवर युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्वाळा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेली अतिरिक्त तैनाती हीच बाब अधोरेखित करीत आहे.

leave a reply