मॉस्को/लंडन – ‘रशियावर लादलेल्या निर्बंधांनंतर देशातील दुकाने व सुपरमार्केटस् ओस पडतील आणि सर्व सेवा कोसळून पडतील, असे अंदाज पाश्चिमात्य विश्लेषकांनी वर्तविले होते. मात्र पाश्चिमात्य देशांनाचा अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. पाश्चिमात्य नेत्यांनी आपल्या जनतेला लेट्यूस किंवा टोमॅटो खाऊ नका तर कंदमुळे वापरा असे सांगण्याची वेळ ओढावली. कंदमुळे वाईट नाहीत पण त्यासाठीही पाश्चिमात्यांना कदाचित रशियाकडूनच मागणी करावी लागेल’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्यांची खिल्ली उडविली.
गेल्या काही महिन्यात अमेरिका व ब्रिटनसह अनेक युरोपिय देशांमध्ये महागाई भडकली असून टोमॅटोसह अनेक जीवनावश्यक उत्पादनांची टंचाई भासू लागली आहे. यावर मात करण्यासाठी ब्रिटनच्या एका मंत्र्यांनी टोमॅटोऐवजी स्थानिक उत्पादन असलेली कंदमुळे खा, असा सल्ला दिला होता.