अफगाणींना देश सोडण्याची परवानगी मिळणार नाही

- तालिबानने हुकूम काढला

परवानगीकाबुल – ‘परदेशी नागरिकांनी 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडून जावे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची बंधने नाहीत. पण अफगाणी नागरिकांना देश सोडायची परवानगी मिळणार नाही. पाश्‍चिमात्य देशांनी देखील उच्चशिक्षित अफगाणींना यासाठी फूस लावू नये’, असा इशारा तालिबानने दिला. यानंतर अफगाणींमध्ये दहशत पसरली असून काबुल विमानतळाबाहेर गर्दी करणारे अफगाणी विमानतळात शिरण्यासाठी जीवावर उदार झाले आहेत.

तालिबानी दहशतवाद्यांच्या अमानवी कारवायांच्या व्हिडिओ, फोटोग्राफ्स व बातम्या अफगाणी जनतेमधील भीती वाढवित आहेत. दररोज हजारो अफगाणी नागरिक काबुल विमानतळाकडे धाव घेत आहेत. तालिबानच्या राजवटीतून बाहेर काढण्यासाठी अफगाणी जनता विमानतळावर उपस्थिती नाटोचे जवान, परदेशी दूतावासांच्या अधिकाऱ्यांकडे गयावया करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय संघटना देखील अफगाणींना तातडीने बाहेर काढण्यासाठी आवाहन करीत आहेत.

पण तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने काबुल विमानतळाकडे जाणारा मार्ग बंद केल्याचे मंगळवारी जाहीर केले. ‘अफगाणींसाठी हा मार्ग बंद केला असून परदेशी नागरिकच विमानतळावर जाऊ शकतात. अफगाणी जनतेने आपल्या राहत्या घरासाठी रवाना व्हावे. तालिबान त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल’, असे मुजाहिदने सांगितले. तसेच ‘अमेरिकेने उच्चशिक्षित अफगाणी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित करू नये. अफगाणिस्तानला डॉक्टर्स, इंजिनिअर्सची गरज आहे’, असे परवानगीमुजाहिद माध्यमांसमोर म्हणाला. आत्तापर्यंत तालिबानच्या विरोधात पाश्‍चिमात्य देशांना सहाय्य करणाऱ्यांनाही माफ केल्याचे मुजाहिदने जाहीर केले. गतकाळातील गोष्टी पुन्हा उकरून काढल्या जाणार नसल्याचा दावा मुजाहिद याने केला. पण अजूनही तालिबानचे दहशतवादी घराघरात जाऊन आपल्या विरोधकांचा शोध घेत असल्याचे व्हिडिओज्‌ समोर आले आहेत. अफगाणी विनोदी कलाकार फझल मोहम्मद याच्या हत्येबाबत हटकल्यानंतर, मुजाहिदने याने फझल हा तालिबानविरोधी होता, असे सांगून त्याच्या हत्येचे समर्थन केले.

महिला व तरुणींनी घराबाहेर पडू नये असे सांगून मुजाहिद याने महिलांच्या अधिकारांबाबत स्वत:च केलेल्या विधानांपासून फारकत घेतली. महिला आणि मुलींच्या अधिकारांची सुरक्षा केली जाईल, अशी घोषणा तालिबानच्या या प्रवक्त्याने गेल्या आठवड्यातच केली होती. पण या नव्या आदेशामुळे तालिबानच्या राजवटीत महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्याचबरोबर तालिबानने कितीही उदार भूमिका स्वीकारल्याचे दावे ठोकले तरी या दहशतवादी संघटनेत अजिबात फरक पडलेला नसल्याचे मुजाहिद याच्या घोषणेतून स्पष्ट झाले.

leave a reply