आफ्रिकन देशांना भीषण उपासमारीचा धोका

- आफ्रिकन नेत्यांचा इशारा

मलाबो – हिंसाचार, हवामान बदलांच्या दुष्परिणामांसह आणि लष्करी उठाव यांनी ग्रासलेल्या आफ्रिकी देशांना मानवतावादी सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. वेळीच हे सहाय्य मिळाले नाही तर आफ्रिकी देशांना उपासमारीचा मोठा धोका संभवतो, असा इशारा आफ्रिकी नेत्यांनी दिला आहे. इक्वेटोरियल गिनी या आफ्रिकी देशात सुरू असलेल्या परिषदेत आफ्रिकी नेत्यांनी ही भीती व्यक्त करून आंतरराष्ट्रीय समुदायाला सहाय्याचे आवाहन केले. दरम्यान, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेने देखील आफ्रिकन देशांना मंदी व महागाईचा सामना करावा लागेल, असे बजावले आहे.

आफ्रिकन देशांना भीषण उपासमारीचा धोका - आफ्रिकन नेत्यांचा इशाराआफ्रिकेतील हिंसाचार, लष्करी उठाव आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेले अन्नसंकट यावर चर्चा करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनी या देशाची राजधानी मलाबो येथे आफ्रिकी नेत्यांची विशेष बैठक सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिकेतील जनतेवर भीषण संकट कोसळले आहे. संघर्ष, उठाव, दहशतवादी हल्ले यामुळे आफ्रिकेतील कोट्यवधी जनता विस्थापित झाली आहे. तर 20 कोटींहून अधिक जण कुपोषणाला सामोरे जात असल्याची हादरवून टाकणारी माहिती या बैठकीत देण्यात आले. आफ्रिकी जनतेवर कोसळलेल्या या संकटाचे निराकरण करण्यासाठी सर्वच देशांनी एकत्र येण्याचे आवश्यक असल्याचे संयुक्त आवाहन आफ्रिकी नेत्यांनी या बैठकीत केले.

त्याचबरोबर आफ्रिकेच्या साहेल भागात तसेच ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील देशांमधील परिस्थिती अतिशय बिकट असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने या भागासाठी नियुक्त केलेल्या मानवतावादी सहाय्यक बार्बरा मँझी यांनी देखील आफ्रिकेतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. वाढत्या हिंसाचारामुळे बेघर झालेली आफ्रिकी जनता असुरक्षिततेच्या भावनेमुळे आपल्या घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे हे विस्थापित बेरोजगार झाले असून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे अवघड बनल्याचे मँझी यांनी सांगितले.

माली आणि बुर्कीना फासो या दोन्ही देशांच्या सीमेवरील जिबो शहराचे उदाहरण मँझी यांनी दिले. फेब्रुवारी महिन्यापासून या शहरात अल कायदा आणि आयएसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनांनी धुमाकूळ घातला आहे. हे दहशतवादी जनतेपर्यंत आवश्यक मदतही पोहोचू देत नाहीत, अशी व्यथा मँझी यांनी मांडली. या दहशतवाद्यांनी आत्तापर्यंत हजारो जणांचा बळी घेतला असून त्यांच्या हिंसाचारामुळे वीसलाख जण विस्थापित झाले आहेत. स्थानिक सरकार हतबल बनले आहे, याची जाणीव होताच दहशतवादी मदतकार्याची अडवणूक करतात आणि सरकारची कोंडी करून वेठीस धरतात, असे एका विश्लेषकाने म्हटले आहे.

साहेलसारख्या भागात जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यामुळे या क्षेत्रातील अन्नधन्याच्या दुभिक्ष्याचे संकट अधिकच भयानक स्वरुप धारण करीत आहे, याकडे आफ्रिकी नेते लक्ष वेधत आहेत. हिंसाचार आणि अस्थैर्यामुळे आफ्रिकी देशांना येत्या काळात मंदी व भीषण महागाईचा सामना करावा लागू शकतो, असेही बजावले जात आहे. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेने याबाबत गंभीर इशारा देऊन सावध केले आहे.

leave a reply