सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आल्यानंतर भारत दहशतवादविरोधी कारवाया व सागरी सुरक्षेला प्राधान्य देईल

- संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्ती

संयुक्त राष्ट्रसंघ – ज्या महिन्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू होत आहे, त्याच ऑगस्ट महिन्यात भारताकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद येत आहे. हा अप्रतिम योगायोग ठरतो, असे सांगून संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एन. तिरूमुर्ती यांनी त्यावर आनंद व्यक्त केला. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत दहशतवादविरोधी कारवाया, सागरी सुरक्षा आणि शांती मोहिमांना विशेष प्रधान्य देईल, अशी घोषणा तिरूमुर्ती यांनी केली.

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आल्यानंतर भारत दहशतवादविरोधी कारवाया व सागरी सुरक्षेला प्राधान्य देईल - संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्ती1 जानेवारी 2021 रोजी भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनला होता. 1 ऑगस्टपासून भारताकडे सुरक्षा परिषेचे अध्यक्षपद आले आहे. याचा उल्लेख करून भारताच्या राजदूतांनी आपल्या देशाचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला. अध्यक्षपदाच्या एका महिन्याच्या कालावधीत भारत सागरी सुरक्षा व दहशतवादविरोधी कारवायांना महत्त्व देणार असल्याचे राजदूत तिरूमुर्ती म्हणाले. चीनच्या बेजबाबदार व वर्चस्ववादी कारवायांमुळे सागरी सुरक्षा धोक्यात आलेली आहे. जगभरातील प्रमुख देशांकडून तसे आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या राजदूतांनी केलेली ही घोषणा लक्षवेधी ठरते.

याबरोबरच दहशतवादविरोधी कारवायांना भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष म्हणून प्राधान्य देणार असून यावर विशेष भर दिला जार असल्याचे राजदूत तिरूमुर्ती म्हणाले. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत भर पडू शकते. अफगाणिस्तानातील तालिबानचा हिंसाचार हा सार्‍या जगासाठी चिंतेचा विषय बनलेला असताना, तालिबानची पाठराखण करणार्‍या पाकिस्तानची जगभरात नाचक्की होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जगासमोर मांडण्याची फार मोठी संधी सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने भारताकडे चालून आली आहे. याचा वापर करण्याची तयारी भारताने केल्याचे तिरूमुर्ती यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून भारताची झालेली निवड व त्यासाठी भारताला इतर देशांकडून मिळालेले समर्थन, यावर पाकिस्तानने फार मोठी चिंता व्यक्त केली होती. सुरक्षा परिषदेचा सदस्य बनल्यानंतर भारत शक्य त्या मार्गाने पाकिस्तानला लक्ष्य करील, अशी भीती पाकिस्तानी विश्‍लेषक व्यक्त करीत होते. त्यामुळे भारताच्या राजदूतांनी केलेल्या विधानांचे पडसाद पाकिस्तानात उमटण्याची दाट शक्यता आहे. याआधीही भारताने सुरक्षा परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावर ठाम भूमिका स्वीकारली होती.

दहशतवादी संघटना व त्यांची पाठरखण करणार्‍या देशांवर कारवाईचे प्रयत्न रोखणार्‍यांना भारत कडाडून विरोध करील व हे प्रयत्न हाणून पाडेल, असे राजदूत तिरूमुर्ती यांनी नुकतेच म्हटले होते.

leave a reply