ब्राझिलमधील हल्ल्यानंतर बोल्सोनारो यांच्या दीड हजार समर्थकांना अटक

ब्रासिलिया – ब्राझिलची राजधानी ब्रासिलियामध्ये झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या दीड हजारांहून अधिक समर्थकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सुरू असतानाच रिओ दि जानिरो व साओ पावलो या शहरांमध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ व्यापक मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्यांमध्ये हल्लेखोरांना माफी देऊ नका, अशी आक्रमक मागणी करण्यात आली. दरम्यान, रविवारच्या हल्ल्यांनंतर ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. तर चिली व कोलंबिया या देशांनी लॅटिन अमेरिकी देशांची संघटना असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेटस्‌‍’ या गटाच्या बैठकीची मागणी केली आहे.

pro-democracy rallies brazilरविवारी ब्राझिलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी राजधानी ब्रासिलियातील संसद, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्लाबोल करून प्रचंड नासधूस केली. या घटनेची जगभरातून निंदा होत असून ब्राझिलमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोमवारी ब्राझिलच्या प्रमुख शहरांमध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चे काढण्यात आले. यात हिंसाचार करणाऱ्यांची तीव्र शब्दात निंदा करीत त्यांना कोणत्याही प्रकारे माफी देऊ नका, अशी मागणीही करण्यात आली. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांनीही हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

दरम्यान, लष्कर व पोलीसदलाने बोल्सोनारो यांच्या समर्थकांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील काही दिवस मोहीम सुरू राहिल, असे संकेत देण्यात आले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले असून लवकरच आपण ब्राझिलमध्ये दाखल होऊ असे जाहीर केले.

leave a reply