युक्रेनमध्ये रशियाची लढाई नाटो, अमेरिका व ब्रिटनविरोधात आहे

नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह

NATO and EU sign declaration on cooperation, in Brusselsमॉस्को – ‘युक्रेनमध्ये सुरू असणारे युद्ध हा रशिया व युक्रेनमधील संघर्ष नाही. ही रशिया व नाटोमधील लष्करी लढाई आहे. यात अमेरिका व ब्रिटनचाही सहभाग आहे’, असा दावा रशियाच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह यांनी केला. पाश्चिमात्य देश सातत्याने रशियाचे तुकडे करण्याच्या योजना आखत आहेत, असा आरोपही पत्रुशेव्ह यांनी केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही त्याला दुजोरा दिला. रशियन अधिकारी आरोप करीत असतानाच नाटो व युरोपिय महासंघादरम्यान ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’च्या ठरावाला मान्यता देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्य तसेच गोपनीय माहिती तसेच तंत्रज्ञान पुरविण्यात येत आहे. अमेरिकेसह अनेक युरोपिय देशांमधील माजी लष्करी अधिकारी, जवान तसेच नागरिक युक्रेनमध्ये संघर्ष करीत आहेत. त्यासाठी युक्रेनच्या लष्करात स्वतंत्र ‘फॉरेन लिजन’ची उभारणीही करण्यात आली आहे. याअंतर्गत जवळपास पाच हजार परदेशी नागरिक युक्रेनमध्ये लढत असल्याचे सांगण्यात येते.

Russian Security Council त्याव्यतिरिक्त सध्या सुरू असलेल्या लढाईत युक्रेनी संरक्षणदलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्य शस्त्रे व तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अमेरिका, ब्रिटन व फ्रान्ससारखे देश युक्रेनला गोपनीय माहितीही पुरवित आहेत. अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांची छोटी लष्करी पथकेही युक्रेनमध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. परदेशी जवानांच्या या पथकांना रशियाने सातत्याने लक्ष्य केले असून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक परदेशी जवान ठार तसेच जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रमुखांनी युक्रेनमध्ये रशिया नाटो व पाश्चिमात्य देशांविरोधात लढत असल्याचे वक्तव्य करून लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी रशियाने पाश्चिमात्य देशांना युक्रेनमधील सहभागावरून सातत्याने इशारे दिले होते. नाटो व अमेरिका अप्रत्यक्षरित्या युक्रेन युद्धात सहभागी असल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले होते. मात्र पत्रुशेव्ह यांनी रशिया नाटो, अमेरिका व ब्रिटनशी संघर्ष करीत असल्याचे उघडपणे सांगून पुढील काळात ही लढाई अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत.

पाश्चिमात्य देशांच्या आघाडीला रशियाच्या सीमा 15 व्या शतकात जिथे होत्या तिथपर्यंत न्यायच्या आहेत, असा ठपका पत्रुशेव्ह यांनी ठेवला. रशियाला कमकुवत करण्यासाठी पाश्चिमात्य देश युक्रेनचे रक्त सांडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

leave a reply